निवड यादीनंतर २४ तासांत एलडीसींच्या विविध खात्यांत नियुक्त्या

नऊ महिन्यांत भरती प्रक्रिया पूर्ण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd October, 12:55 am
निवड यादीनंतर २४ तासांत एलडीसींच्या विविध खात्यांत नियुक्त्या

पणजी : लोअर डिव्हिजन क्लार्क (एलडीसी) पदांसाठी झालेल्या कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कर्मचारी भरती आयोगाने २४ तासांच्या आत निवड यादी जाहीर केली. निवड यादी जाहीर करून २४ तासांतच उमेदवारांची नियुक्ती झालेल्या खात्यांची यादीही आयोगाने प्रसिद्ध केली. आता संबंधित खात्यांमार्फत एलडीसी/रिकव्हरी क्लार्कना नियुक्ती पत्रे मिळतील. यामुळे एका आठवड्याच्या आत ३२ खात्यांमध्ये २१५ नवे एलडीसी रुजू होतील.
दरम्यान, कर्मचारी भरती आयोगाने कोणता एलडीसी/रिकव्हरी क्लार्क कोणत्या खात्यात रुजू होणार आहे, याची यादी आपल्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध केली आहे. यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराचे नाव, त्याला मिळालेले खाते आणि गुण अशा स्वरूपाचा तपशील आहे.
विविध सरकारी खात्यांनी त्यांच्या गरजेनुसार एलडीसी पदांचा तपशील आयोगाला दिला होता, त्यानुसार आयोगाने १३ डिसेंबर २०२४ रोजी जाहिरात दिली. जाहिरातीनंतर ११, १२, १८, १९ आणि २५ जानेवारी २०२५ रोजी उमेदवारांची सीबीटी परीक्षा झाली. सीबीटी परीक्षेतील गुणांच्या आधारावर शालांत मंडळाकडून कौशल्य चाचणी घेण्यात आली. कौशल्य चाचणीनंतर अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली.
सीबीटीच्या गुणांच्या आधारावर विविध गटांमधून एकूण २१५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या २१५ उमेदवारांमध्ये विविध प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. आयोगाने निवड यादीसह प्रतिक्षा यादीही जाहीर केली आहे. दरम्यान, एलडीसी पदांसोबतच याच वेळी ज्युनियर स्टेनोग्राफर पदांसाठीही जाहिरात देण्यात आली होती आणि त्या पदांवर भरती करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
आरक्षणानुसार निवडलेले उमेदवार
सामान्य गट : १०२
ओबीसी : ५१
अनुसूचित जमाती : २६
अनुसूचित जाती : ८
खेळाडू : १
माजी सैनिक : ३
दिव्यांग : ८