आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन रद्द करा

टेस्ला, स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांचे आवाहन

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
01st October, 07:06 pm
आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन रद्द करा

वॉशिंग्टन : नेहमीच वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट्समुळे चर्चेत राहणारे टेस्ला व स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी आता नेटफ्लिक्सवर निशाणा साधला आहे. मस्क यांनी स्वतःचे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रद्द केल्याची माहिती एक्स (माजी ट्विटर) वर दिली असून, लोकांनाही आवाहन केले आहे की, तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी नेटफ्लिक्स (Netflix) सब्सक्रिप्शन रद्द करा.

अमेरिकन ऊर्जा विभागातील माजी अणु संशोधक व प्रसिद्ध छायाचित्रकार मॅट व्हॅन स्वॉल यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, त्यांनी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रद्द केले आहे. ही पोस्ट रिपोस्ट करत मस्क यांनी देखील सहमती दर्शवली.

स्वॉल यांनी यामागील कारण स्पष्ट करताना लिहिले की, नेटफ्लिक्सने अशा व्यक्तीला नोकरीवर घेतले आहे ज्याने चार्ली कर्क यांच्या हत्येनंतर जल्लोष केला होता. तसेच नेटफ्लिक्स मुलांना तृतीयपंथीयांच्या बाजूने आकर्षित करणारे (pro-trans) कंटेंट प्रसारित करत आहे.

दरम्यान, डॉजडिजायनर या एक्स पेजवरून देखील यासंदर्भातील पोस्ट करण्यात आली. त्यात म्हटले होते, तुमच्या मुलांचे संरक्षण करा. तृतीयपंथीयांचा प्रचार करणाऱ्या कुटील डावापासून त्यांना दूर ठेवा. यासाठी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रद्द करा.

कोण आहेत हॅमिश स्टील?

ज्या नेटफ्लिक्स कर्मचाऱ्यावर मस्क यांनी आक्षेप घेतला आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून नेटफ्लिक्सचे संचालक हॅमिश स्टील (Hamish Steele) आहेत. त्यांनी चार्ली कर्क यांच्या हत्येच्या घटनेनंतर कर्क यांची थट्टा उडवल्याचा आरोप आहे. स्टील हे नेटफ्लिक्सच्या डेड एंड : पॅरानॉर्मल पार्क’ शोचे निर्माते देखील आहेत. स्टील यांचा नेटफ्लिक्सवरील शो डेड एंड : पॅरानॉर्मल पार्कमधील एक क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामुळे या कार्यक्रमावर टीका देखील होत आहे. हा लहान मुलांवर आधारित एक अ‍ॅनिमेटेड शो आहे. यावर ट्रान्सफोबिक विरोधी विचारधारेला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप होत आहे.