कुर्टी सब स्टेशनला अचानक आग; वीज पुरवठा एक तास खंडित

फोंडा शहरासह अन्य भागांना फटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
कुर्टी सब स्टेशनला अचानक आग; वीज पुरवठा एक तास खंडित

कुर्टी येथील सब स्टेशनवर लागलेली आग.

फोंडा : वीज खात्याच्या कुर्टी येथील सब स्टेशनला अचानक लागलेल्या आगीमुळे फोंडा शहराबरोबर आसपासच्या पंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा एक तास खंडित करण्यात आला. सुदैवाने, या आगीत कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११.१५च्या सुमारास कुर्टी सब स्टेशनमधील काही भागात ठिणग्या पडायला सुरुवात झाली. वीज पुरवठा करणाऱ्या काही तांत्रिक मशिनरींना आग लागून बघता बघता तिने रौद्ररूप धारण केले. दसऱ्यानिमित्त बेतोडा, कुंडई आणि इतर औद्योगिक वसाहती सकाळच्या वेळेस बंद असतात. परिणामी, त्यांचा विजेचा वापर खूपच कमी होतो. अशा वेळी ज्या सब स्टेशनवरून पुरवठा केला जातो, तिथे काही वेळा अचानक विजेचा दाब वाढू शकतो. कदाचित असाच प्रकार कुर्टी सब स्टेशनवर घडला असावा आणि आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.खात्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत अगोदर त्या भागातून होणारा वीज पुरवठा पूर्णपणे बंद केला. परिणामी नगरपालिका क्षेत्र, बेतोडा, मडकई, कवळे, बांदोडा, कुर्टी खांडेपार आदी पंचायत क्षेत्रांतील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. एक तासानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.
गावणे येथे एका कार्यक्रमाप्रसंगी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना सदर माहिती देण्यात आली. त्यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून खबरदारी घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, या आगीत वीज खात्याचे नेमके किती नुकसान झाले आहे याची माहिती उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती.

हेही वाचा