एनसीआरबीचा अहवाल : गोव्यात २८६ गुन्ह्यांची नोंद
पणजी : राष्ट्रीय गुन्हा रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी) ने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत महिलांवरील अत्याचारांबाबत जारी केलेल्या अहवालातून गोव्यातील गंभीर वास्तव समोर आले आहे. २०२३ मध्ये राज्यात एकूण ३२७ महिलांवर लैंगिक तसेच इतर अत्याचार झाल्याप्रकरणी २८६ गुन्हे नोंद झाले. यातील ९७ प्रकरणे निव्वळ लैंगिक अत्याचारांची असून, विशेष म्हणजे त्यापैकी ९१ प्रकरणांतील (९३.८ टक्के) संशयित हे पीडितेच्या ओळखीचेच असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये राज्यातील विविध न्यायालयांनी महिलांवरील अत्याचारासंदर्भातील केवळ १४ खटल्यांचा अंतिम निकाल देऊन दोषींना शिक्षा ठोठावली तर, १११ खटल्यांतील संशयितांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. तर ९ खटल्यांतील संशयितांना आरोपातून मुक्त केले आहे. याशिवाय विविध न्यायालयांत महिलांवरील अत्याचाराचे डिसेंबर २०२३ पर्यंत १,८६४ खटले प्रलंबित होते.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, राज्यात भारतीय दंड संहितेच्या कलमाअंतर्गत २०२३ मध्ये ३०९ महिलांवर अत्याचार झाल्याप्रकरणी २७७ गुन्हे नोंद झाले होते. ९७ गुन्हे लैंगिक अत्याचाराचे असून त्यात ९८ पीडिताचा समावेश होता. त्यातील ९१ गुन्ह्यांतील संशयित पीडिताच्या परिचितांमधीलच आहेत. त्यात १७ नातेवाईक, ४५ मित्र तर २९ संशयित शेजारील किंवा कुटुंबातील सदस्यांच्या ओळखीचे आहेत. केवळ ६ संशयित अनोळखी आहेत. तर लैंगिक अत्याचारातील पीडितापैंकी ६३ अठरा वर्षांखालील मुली, तर ३५ महिलांचा समावेश होता.
वरील कालावधीत १०७ महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी ९६ गुन्हे, एका महिलेचा गुन्हा हुंडाबळीमुळे नोंद झाला. तीन महिलांना पतीने किंवा नातेवाईकाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ३ गुन्हे, ५३ महिलांच्या अपहरण प्रकरणी ५१ गुन्हे, २६ वेश्याव्यवसाय किंवा महिलांची तस्करी केल्याप्रकरणी ८ गुन्हे, २१ महिलांचा अपमान किंवा छेडल्यामुळे २१ गुन्हे दाखल झाले होते. तर १८ महिलांवर सायबर गुन्ह्यांखाली अत्याचार केल्याबद्दल ९ गुन्ह्यांची नोंद झाली होती, असे एनसीआरबीने अहवालात नमूद करण्यात आले आहे.
२०२३ मध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी ९७ गुन्हे नोंद झाले होते. त्यात १८ वर्षांखालील ६३ मुलीचा, तर ३५ महिलांचा समावेश आहे.
लैंगिक अत्याचारांतील पीडित
पीडिताचे वय - पीडितांची संख्या
६ वर्षांखालील -- ०१
६ ते १२ वर्षांमधील -- ०२
१२ ते १६ वर्षांमधील -- ३४
१६ ते १८ वर्षांमधील -- २६
१८ ते ३० वर्षांमधील -- २३
३० ते ४५ वर्षांमधील -- १०
४५ ते ६० वर्षांमधील -- ०२
एकूण -- ९८
-------------
न्यायालयात प्रलंबित खटल्यांचा मोठा आकडा
- डिसेंबर २०२३ पर्यंत विविध न्यायालयांत १,८६४ खटले प्रलंबित होते.
- २०२२ मध्ये १,८११ खटले प्रलंबित होते, त्यात २०२३ मध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या २०४ आरोपपत्रांची भर पडल्याने २०२३ मध्ये एकूण २,०१५ खटल्यांची सुनावणी घेण्यात आली.
- यापैकी केवळ १४ खटल्यांमध्ये दोषींना शिक्षा ठोठावण्यात आली.
- १११ खटल्यांतील संशयितांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले, तर ९ खटल्यांतील संशयितांना आरोपातून मुक्त केले गेले.
- ११ खटले संशयितांवर आरोप निश्चित होण्यापूर्वी न्यायालयाने निकालात काढले. ११ खटल्यात संशयिताला दंड ठोठावला.
- ६ गुन्ह्यांतील संशयितांचा खटला सुरू असताना मृत्यू झाल्यामुळे ती प्रकरणे निकालात काढली.