‘माझी बस’ योजनेत सहभागी व्हा ! : नफ्यापेक्षा सेवेला प्राधान्य, कदंबचा ४५वा वर्धापनदिन उत्साहात
पणजी : कदंब बस सेवा ही गोव्याची जीवनवाहिनी आहे. कदंबच्या माध्यमातून ५५० बसेस धावत आहेत. कदंब वाहतूक महामंडळ नफ्यापेक्षा सेवेला प्राधान्य देते. ग्रामीण आणि शहरी भागांना जोडण्यासाठी, तसेच राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कदंब महामंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कदंब महामंडळातर्फे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठीही सवलती दिल्या जातात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कदंब परिवहन महामंडळाने पणजी बस स्थानकावर आपला ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वाहतूक मंत्री माॅविन गुदिन्हो, कदंब परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, संचालक परिमल अभिषेक, कदंबचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
सरकार 'माझी बस' योजनेखाली बस मालकांना सध्या दरमहा १८ हजार रुपयांचे अनुदान देते. भविष्यात हे अनुदान २५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार करत आहे. तसेच, नवीन बस घेण्यासाठी सरकार १० लाखांपर्यंतचे अनुदानही देते. त्यामुळे बस मालकांनी इतरांचे ऐकण्यापेक्षा 'माझी बस' योजनेत त्वरित सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कर्मचाऱ्यांच्या थकबाकीवर लवकरच तोडगा
कदंबच्या निवृत्त आणि सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकबाकीचा विचार सरकारने सुरू केला आहे. याबद्दल कदंब परिवहन महामंडळाचे अधिकारी सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. सरकारने आतापर्यंत ५० टक्के थकबाकी दिली आहे आणि उर्वरित थकबाकी तीन महिन्यांत देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. कदंब महामंडळ नफा कमावण्यासाठी नाही, तर सेवा देण्यासाठी चालवले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.लोकांना जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी मासिक पास प्रणाली समाविष्ट करण्याची गरज आहे. आता सिंगल कार्ड सर्व बसेसमध्ये चालेल. स्मार्ट ट्रान्झिट कार्ड ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाईल. 'माझी बस' योजनेच्या लाभार्थ्यांनाही या यंत्रणेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून या बसेसही डिजिटलायझेशन होतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
सरकार विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सूट देते. स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, कर्करोग आणि एचआयव्ही रुग्णांना १०० टक्के सूट दिली जाते. मासिक पास घेणाऱ्या ४० टक्के सामान्य लोकांना आणि ७० टक्के विद्यार्थ्यांना लाभ मिळतो.
‘माझी बस’च्या लाभार्थ्यांना २ कोटींचा फायदा
‘माझी बस’ योजनेखाली नोंदणी झालेल्या खासगी बस मालकांना आतापर्यंत सरकारकडून २ कोटी रुपयांपर्यंतचा लाभ मिळाला आहे. माझी बस योजनेतील सरकारी अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव सरकारने विचारात घेतला आहे. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी बस मालक जेवढा विलंब करतील, तेवढे त्यांचे नुकसान होईल, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
कदंब होणार पूर्णपणे डिजिटल
वाहतूक मंत्री माॅविन गुदिन्हो यांनी माहिती देताना सांगितले की, २६ जानेवारी २०२६ पर्यंत कदंब महामंडळाची संपूर्ण यंत्रणा डिजिटल होईल. अॅपद्वारे बसेसचे ट्रॅकिंग होईल. बस कुठे आहे आणि किती वेळेत पोहोचेल, अशा आधुनिक सुविधा प्रवाशांना देण्यात येणार आहेत.