गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक बाब
पणजी : गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या सप्टेंबर महिन्याच्या जीएसटी संकलनात यंदा ३ टक्क्यांनी नोंदवली गेली आहे. प्राप्त माहितीनुसार, यंदा सप्टेंबर महिन्यात जीएसटीद्वारे गोव्याने एकूण ५३५ कोटी रुपये महसूल गोळा केला आहे. गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हे संकलन ५१९ कोटी रुपये होते. या वाढीमुळे राज्याच्या आर्थिक गतीला बळकटी मिळत असल्याचे दिसत आहे.
केवळ गोवाच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या जीएसटी संकलनातही लक्षणीय वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात देशाचे जीएसटी संकलन १ लाख ३६ हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे. यंदाचे देशाचे जीएसटी संकलन मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापेक्षा तब्बल ७ टक्क्यांनी जास्त आहे. हे आकडे देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाढती मागणी आणि कर अनुपालन यात सुधारणा होत असल्याचे दर्शवतात.
अहवालानुसार, एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत जीएसटी रूपाने केंद्राने गोव्यातून १,४९५ कोटी, तर राज्याने २,११४ कोटी रुपये संकलन केले आहे. याच कालावधीत केंद्र सरकारने इंटिग्रेटेड जीएसटीमधून (आयजीएसटी) गोव्याला दुसऱ्या टप्प्यातील १,२७८ कोटी रुपयांचा वाटा दिला आहे. मागील वर्षी याच सहा महिन्यांत हा वाटा १,२५९ कोटी रुपये होता. यंदा या वाट्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे, जो राज्याच्या विकासाच्या प्रकल्पांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
अन्य राज्यांकडून सर्वाधिक जीएसटी संकलन
- महाराष्ट्रातून सर्वाधिक २७ हजार ७६२ कोटी रु.
- कर्नाटकातून १३ हजार ४९५ कोटी रुपये.
- तामिळनाडूतून ११ हजार ४१३ कोटी रुपये.
- मिझोरममधून सर्वात कमी २९ कोटी रुपये.
- केंद्रशासित प्रदेशात दिल्लीतून सर्वाधिक ५ हजार ७७१ कोटी रुपये.