नवे दर लागू : घरगुती, व्यावसायिकांवर होणार परिणाम
पणजी : आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता वीज दरवाढीचा मोठा झटका बसणार आहे. संयुक्त वीज नियामक आयोगाने (जेईआरसी) २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांसाठी सरासरी ४ टक्क्यांची दरवाढ मंजूर केली आहे. आयोगाने नुकताच आदेश जारी केला असून, हे नवे दर १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झाले आहेत.
या दरवाढीचा थेट परिणाम घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील ग्राहकांवर होणार आहे. यापूर्वी वीज खात्याने २०२५-२६ ते २०२७-२८ साठी ४.८ ते ५.९ टक्क्यांची दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता.
याआधी कमी दाब असणाऱ्या घरगुती ग्राहकांना ० ते १०० युनिटपर्यंत प्रती युनिट १.९० रुपये द्यावे लागत होते. २०२५-२६ मध्ये त्यात वाढ होऊन १.९५ रुपये द्यावे लागतील. १०१ ते २०० युनिटसाठीचे दर प्रती युनिट २.८० रुपयांवरून २.९० रुपये, २०१ ते ३०० युनिटसाठीचे दर प्रती युनिट ३.७० रुपयांवरून ३.९० रुपये, ३०१ ते ४०० युनिटसाठीचे दर प्रती युनिट ४.९० रुपयांवरून ५.१५ रुपये तर ४०० युनिटच्या वर ५.८० रुपयांवरून ६.२० रुपये प्रती युनिट इतके वाढवण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष २०२९-३० पर्यंत हे दर वाढत जाणार आहेत.
कमी दाब असणाऱ्या औद्योगिक ग्राहकांसाठी ० ते ५०० युनिट पर्यंत प्रती युनिट ४ रुपये द्यावे लागत होते. आता त्यामध्ये वाढ होऊन प्रती युनिट ४.२० रुपये द्यावे लागणार आहेत. तर ५०० ते १०० युनिट पर्यंत प्रती युनिट ४.६५ रुपयांऐवजी ४.७० रुपये भरावे लागतील. ५०० पेक्षा जास्त वापर असणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ५ रुपये भरावे लागतील. कमी दाब असणाऱ्या कृषी ग्राहकांना प्रती युनिट १.५५ ऐवजी १.६० रुपये द्यावे लागतील. कमी दाबाच्या १० ते ८० किलो वॉट पर्यंत प्रती महिना वीज वापरणाऱ्यांना १.६५ ऐवजी १.७० द्यावे लागतील. तर ८५ किलो वॉट प्रती महिना वीज वापरणाऱ्यांना १.९० रुपये द्यावे लागतील.
‘टाईम ऑफ डे’चा पर्याय
वीज खात्याने दरवाढीसोबत ‘टाईम ऑफ डे’ हा पर्याय दिला आहे. यानुसार वीज कोणत्या वेळी वापरली जाते, त्यावर वीज दर ठरवले जाणार आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यावर हा पर्याय ग्राहकांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे.
वीज दरवाढ टक्केवारी
वर्ष / दरवाढ
२०२१-२२ / ३.१८
२०२२-२३ / १.५८
२०२३-२४/ ५.१९
२०२४-२५/ ३.५०
जेईआरसीने वीज दरवाढीला मान्यता दिल्याने राज्यात ऑक्टोबरपासून किरकोळ दरवाढ लागू होणार आहे. ही दरवाढ अत्यंत कमी असून, दरवाढ झाल्यानंतरही इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात विजेचे दर सर्वात कमी राहतील. - सुदिन ढवळीकर, वीजमंत्री