पणजी : मानवाधिकार आयोगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला मडगाव येथील एका कॅफेचे कामकाज बंद ठेवण्याचा आदेश देण्याची शिफारस केली आहे. या कॅफेने यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. मंडळाने त्या हॉटेलबाबतच्या स्वतःच दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणा दाखवल्याने मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मडगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्या इमारतीमध्ये सुरू असणाऱ्या कॅफेबाबत आयोगाकडे तक्रार केली होती. हॉटेलचे स्वयंपाक घर इमारतीच्या तळमजल्यावर होते. नंतर येथे तीन औद्योगिक दर्जाचे एक्झॉस्ट फॅन बसवण्यात आले. तसेच दोन मोठे ग्राइंडर देखील बसवण्यात आले. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होऊ लागले. येथील जमिनीला हादरे बसू लागले.
याबाबत त्या व्यक्तीने तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील पाहणी केली. आवश्यक परवाने नसल्याने कॅफे तात्पुरता बंद ठेवण्याचे आदेश दिले. पाहणी करताना मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या बेडरूमच्या खालच्या मजल्यावर कॅफेचा गॅस स्टोव्ह असल्याने बेडरूमची जमीन गरम होत असल्याचे निरीक्षण नोंदविले. मंडळाने कॅफेला एक्झॉस्ट फॅनची उंची इमारतीच्या छपराच्या वरपर्यंत नेण्यास सांगितली. तसेच स्वयंपाक घर मॅझेनाईन मजल्यावरून तळमजल्यावर हलवण्यास सांगितले.
मंडळाने कॅफेला हादरे बसू नयेत व जमीन गरम होऊ नये यासाठी उपाय योजना करण्याचे आदेश देखील दिले होते. यावर कॅफेने एप्रिल २०२५ मध्ये आपण या आदेशांची पूर्तता केल्याची माहिती मंडळला दिली होती. मात्र आयोगाला मिळालेल्या माहितीनुसार कॅफेने आदेशाचे योग्य पालन केलेले नाही. यामुळेच आयोगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यांच्या आधीच्या आदेशांचे पालन होईल जोपर्यंत कॅफे बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी शिफारस केली आहे.