फोंडा: फोंडा शहराला वीज पुरवठा करणाऱ्या कुर्टी येथील वीज खात्याच्या सब-स्टेशनला आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून फोंडा शहरासह आसपासच्या पंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा सुमारे एक तास खंडित करण्यात आला होता. सुदैवाने या आगीत कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही.
सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कुर्टी सब-स्टेशनच्या वीज पुरवठा करणाऱ्या काही तांत्रिक मशिनरीतून ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.
सुट्टीच्या निमित्ताने बेतोडा, कुंडई आणि इतर औद्योगिक वसाहती सकाळच्या वेळेत बंद असल्याने विजेचा वापर खूपच कमी होतो. अशा वेळी ज्या सब-स्टेशनवरून पुरवठा केला जातो, तिथे विजेचा दाब अचानक वाढतो. कुर्टी सब-स्टेशनवर असाच प्रकार घडला असावा आणि त्यातून आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्या भागातून होणारा वीज पुरवठा पूर्णपणे बंद केला. परिणामी फोंडा नगरपालिका क्षेत्र, बेतोडा, मडकई, कवळे, बांदोडा, कुर्टी आणि खांडेपार या पंचायत क्षेत्रांमधील वीजपुरवठा खंडित झाला. सुमारे एक तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आणून वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.
दरम्यान, वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांना गावणे येथील एका कार्यक्रमादरम्यान या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने खबरदारी घेण्याचे आणि दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. या आगीत वीज खात्याचे नेमके किती नुकसान झाले आहे, याची माहिती उशिरापर्यंत मिळू शकली नाही.