कदंब महामंडळाचा ४५वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पणजी: कदंब महामंडळाचा ४५ वा वर्धापन दिन पणजी बसस्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'म्हजी बस योजना' आणि कदंब कर्मचाऱ्यांच्या थकबाकीसंदर्भात दोन मोठे निर्णय जाहीर केले. योजनेत सहभागी होणाऱ्या खासगी बस मालकांना सध्या मिळणारे अनुदान २५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार सरकार करत असून, कर्मचाऱ्यांची उर्वरित थकबाकी पुढील तीन महिन्यांत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला परिवहन मंत्री मॉवीन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेंकर, परिवहन खात्याचे संचालक परिमल अभिषेक आणि कदंबचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
'म्हजी बस' योजनेला प्रोत्साहन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, 'म्हजी बस' योजनेखाली नोंदणी केलेल्या खासगी बस मालकांना आतापर्यंत २ कोटी रुपयांचा लाभ सरकारकडून मिळाला आहे. सध्या या योजनेत सरकार दरमहा १८ हजार रुपये अनुदान देत आहे, जे भविष्यात २५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच, नवीन बस खरेदी करण्यासाठी सरकार १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देत आहे. त्यामुळे खासगी बस मालकांनी कोणाचेही न ऐकता त्वरित या योजनेत सहभागी व्हावे, यात विलंब केल्यास त्यांचेच नुकसान होईल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
कर्मचाऱ्यांना दिलासा
सेवानिवृत्त आणि सध्या सेवेत असलेल्या कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकबाकीचा प्रश्न सरकारने विचारात घेतला आहे. सरकारने आतापर्यंत ५० टक्के थकबाकी अदा केली असून, उर्वरित थकबाकी पुढील तीन महिन्यांत दिली जाईल, अशी ठोस ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
२६ जानेवारीपर्यंत कदंब डिजिटल
यावेळी बोलताना परिवहन मंत्री मावीन गुदिन्हो यांनी कदंब महामंडळाच्या डिजिटायझेशनबद्दल माहिती दिली. २६ जानेवारी २०२६ पर्यंत कदंब महामंडळाची संपूर्ण यंत्रणा डिजिटल होईल. या आधुनिकीकरणानंतर प्रवाशांना ॲपच्या माध्यमातून बसचे थेट ट्रॅकिंग करता येईल. बस कोठे आहे आणि किती वेळेत पोहोचेल, अशा आधुनिक सुविधा प्रवाशांना मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.