गोवा : झेंडूच्या लागवडीत साडेतीन वर्षांत ८६ टक्क्यांनी वाढ

यावर्षी शेतकऱ्यांकडून ८ ते १० टन पिकातून २ कोटींहून अधिक रकमेची उलाढाल शक्य

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
गोवा : झेंडूच्या लागवडीत साडेतीन वर्षांत ८६ टक्क्यांनी वाढ

पणजी : गेल्या साडेतीन वर्षांत राज्यात झेंडूच्या (Marigold) लागवडीत ८६.६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे क्षेत्र वाढल्यामुळे याच काळात शेतकऱ्यांना १.२१ कोटी इतके उत्पन्न मिळाले आहे. परंतु यंदाच्या हंगामात झेंडूच्या व्यवसायात या एका वर्षातच शेतकऱ्यांना २ कोटींचे उत्पन्न मिळेल, अशी शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे.      

कृषी खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांच्या काळात शेतकऱ्यांनी १.७३ कोटी इतके उत्पन्न झेंडू विकून मिळविले. पण वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत वर्ष २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आठ लाख इतकी घट झाली आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये ५२.६० लाख, २०२२-२३ वर्षात ३० लाख, २०२३-२४ वर्षात ४९.५२ लाख आणि २०२४-२५ वर्षात ४१.५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.      

यंदाच्या हंगामात एका वर्षात शेतकऱ्यांना २.८० कोटी इतके उत्पन्न मिळेल, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे. २८ हेक्टर जमिनीत दर हेक्टर ८ ते १० टन झेंडूचे पीक तयार होण्याची शक्यता आहे. जर २८८ टन इतके पीक तयार झाले आणि दर किलो १०० रुपये प्रमाणे हे झेंडू विकले गेले, तर २.८० कोटींपर्यंत शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणे शक्य आहे, असे कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.      

झेंडूच्या लागवडीसाठी सरकारकडून दर हेक्टरमागे ७५ हजार रुपये अनुदान मिळते. यामध्ये राज्य सरकारकडून दर हेक्टरमागे ५५ हजार रुपये तर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन मिशन योजनेअंतर्गत दर हेक्टरमागे २० हजार रुपये इतके अनुदान मिळते. वर्ष २०२१-२२ मध्ये ४.२० लाख, २०२२-२३ मध्ये २.४० लाख, २०२३-२४ मध्ये ३.९८ लाख इतके अनुदान दिले आहे. वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ चे अनुदान अजूनपर्यंत दिलेले नाही.

सांगेत ४.५ हेक्टरमध्ये झेंडूचे पीक      

सर्वांत जास्त झेंडूचे १२९ शेतकरी सांगे तालुक्यात आहेत. तिथे ४.५ हेक्टरमध्ये पीक घेतले जाते. तर सर्वांत जास्त ७.२९५ हेक्टर झेंडूची लागवड केपे तालुक्यात होते. तिथे ४९ शेतकरी झेंडूचे पीक घेतात. तिसवाडी तालुका सर्व तालुक्यांमध्ये पीक घेतले जाते.


हेही वाचा