पणजी: गोव्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटन हंगामाची गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली आहे. रशियातील नोवोसिबिर्स्क येथून या हंगामातील पहिले चार्टर्ड विमान मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) येथे दाखल झाले. या विमानातून १२० हून अधिक पर्यटक गोव्यात दाखल झाले.
पर्यटन विभागाने या पर्यटकांचे गोव्याच्या समृद्ध आदरातिथ्य आणि संस्कृतीचे दर्शन घडवत उत्साहात स्वागत केले. आज पहाटे १.४० वाजता हे चार्टर्ड विमान मोपा येथे उतरले. पर्यटन संचालक केदार नाईक, उपसंचालक जयेश काणकोणकार, सहाय्यक पर्यटन अधिकारी चित्रा वेंगुर्लेकर यांच्यासह पर्यटन क्षेत्रातील भागधारकांनी या प्रवाशांचे स्वागत केले.
पारंपरिक नृत्याने वेधले लक्ष
पर्यटकांसाठी विमानतळावर गोव्याच्या संस्कृती आणि आदरातिथ्याचा समावेश असलेला खास स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये समई नृत्य, घोडेमोडणी, धनगर नृत्य आणि ब्रास बँडचे सादरीकरण करण्यात आले. प्रवाशांचे फुलांनी स्वागत करण्यात आले.
गोव्याला जागतिक पसंती कायम
यावेळी बोलताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, आम्ही एका उत्साही नवीन पर्यटन हंगामात प्रवेश करत आहोत आणि गोवा पर्यटकांचे खुलेपणाने स्वागत करण्यास सज्ज आहे. या पहिल्या चार्टर विमानाचे आगमन हेच दर्शवते की, गोवा पर्यटकांसाठी एक पसंतीचे जागतिक ठिकाण म्हणून आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध करत आहे. राज्यात भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला वाढीव सुरक्षा, उत्तम सुविधा आणि मनमोहक अनुभव मिळेल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन खंवटे यांनी दिले.
पुढील तीन दिवस रशियन विमानांची लगबग
पर्यटन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात रशियातून पर्यटकांचे आगमन सुरूच राहणार आहे.
* उद्या, ३ ऑक्टोबरला नोवोसिबिर्स्क (रशिया) येथून सुमारे १५० पर्यटक घेऊन दुसरे चार्टर विमान सकाळी ६ वाजता मोपा विमानतळावर दाखल होण्याची अपेक्षा आहे.
* ४ ऑक्टोबरला येकातेरीनबर्ग (रशिया) येथून १५८ प्रवासी क्षमतेचे चार्टर विमान सकाळी ६.०५ वाजता मोपा येथे उतरेल.
* तर ५ ऑक्टोबरला मॉस्को (रशिया) येथून २९६ प्रवासी क्षमतेचे एक मोठे चार्टर विमान सकाळी ९ वाजता मोपा विमानतळावर दाखल होईल.