५० लाखांच्या दोन फॉर्च्यूनर जप्त
म्हापसा: गोव्यात नोंदणीकृत भाड्याने घेतलेल्या खासगी गाड्यांची नंबरप्लेट बदलून त्या चोरणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा कोलवाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, छापेमारीदरम्यान निसटलेल्या त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा कसून शोध सुरू आहे.
विश्वसनीय माहितीच्या आधारे, कोलवाळ पोलिसांनी गेल्या रविवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास माडेल, थिवी येथील मांगिरीश कॉलनीमध्ये छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोन फॉर्च्यूनर कारगाड्या जप्त केल्या आणि दीप रमणीकभाई अघेरा (२८, रा. गुजरात) आणि हरप्रीत सुखदेव सिंग (४०, रा. राजस्थान) या दोघांना अटक केली. जप्त केलेल्या या गाड्यांची किंमत ५० लाख ८७ हजार रुपये इतकी आहे.
बनावट नंबरप्लेट आणि जीपीएस जॅमरचा वापर
या टोळीची चोरी करण्याची पद्धत धक्कादायक होती. संशयितांनी पणजी आणि म्हापसा येथून खासगी गाड्या भाड्याने घेतल्या होत्या. नंतर त्या गाड्या पळवण्याच्या उद्देशाने त्यावरची मूळ नंबरप्लेट काढून त्याजागी बनावट नंबर प्लेट (RJ 23 UA 6500 व PB 09 AN 0630) लावल्या. तसेच, कारची जीपीएस यंत्रणा ट्रॅक होऊ नये यासाठी जीपीएस जॅमर डिव्हाईसचा वापर करून ती डिसकनेक्ट केली होती. चोरलेल्या या गाड्या गुजरात व राजस्थानमध्ये नेऊन विकण्याचा या टोळीचा उद्देश होता.
तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू
पोलिसांच्या चौकशीत अटकेतील दोन्ही संशयितांनी आपल्या फरार साथीदाराचे नाव उघड केले आहे. पोलीस छाप्यावेळी हा तिसरा संशयित घटनास्थळापासून काही अंतरावर होता, मात्र पोलीस पथकाला पाहून तो तत्काळ निसटला. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, अटकेत असलेल्या संशयितांच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी, ३ ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे पोलीस त्यांना अतिरिक्त कोठडीसाठी उद्या डिचोली न्यायालयात हजर करणार आहेत.