स्थानिक पक्षांचा गोवा फ्रंट व्हायला हवा : विजय सरदेसाई

गोवेकरांच्या हितासाठी तडजोड करण्यास तयार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
स्थानिक पक्षांचा गोवा फ्रंट व्हायला हवा : विजय सरदेसाई

पणजी : राष्ट्रीय पक्षांसाठी जिल्हा पंचायत, नगरपालिका निवडणुकांपेक्षा बिहार निवडणूक महत्त्वाची आहे. गोव्याच्या पक्षांसाठी जिल्हा पंचायत आणि नगरपालिका निवडणुका महत्त्वाच्या आहेत. गोव्याचे प्रश्न सुटण्यासाठी आणि लोकांच्या हितासाठी स्थानिक पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आरजी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या धोरणांमध्ये फार फरक नाही. त्यामुळे काही मुद्द्यांवर गोवा फॉरवर्ड आणि आरजी पक्ष एकत्र येणे आवश्यक आहे. राजकीय चर्चेनंतर हे शक्य आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.

प्रुडंट मीडियाच्या ‘हेड ऑन’ कार्यक्रमात विजय सरदेसाई यांची प्रुडंट मीडियाचे संपादक संचालक प्रमोद आचार्य यांनी मुलाखत घेतली.

आरजीचे मनोज परब यांच्याशी माझी अजून प्रत्यक्ष चर्चा झालेली नाही. मोपा विमानतळावर टॅक्सी चालकांच्या प्रश्नांवर मनोज परब यांच्याशी मी भेटलो. टॅक्सी चालकांचे प्रश्न आम्ही समजावून घेतले. मोपा विमानतळाचा गोव्याच्या लोकांपेक्षा कोकणाला जास्त लाभ होतो. तेथील लोक मोपा विमानतळावर कामासाठी येतात. यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांकडेही टॅक्सी चालकांचे प्रश्न मांडले. एकत्र येऊन हे प्रश्न मांडणे गरजेचे आहे. आरजी आणि गोवा फॉरवर्ड पक्षांच्या धोरणांमध्ये फार फरक नाही. गोव्याच्या लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो. गोव्याच्या लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

फ्रंट होण्यापूर्वी मुद्द्यांवर चर्चा व्हावी : मनोज परब

गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पोगोसह अनेक विषय आम्ही घेतले. या सर्व मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. गोव्याच्या जमिनींचे संरक्षण आणि पोगो बिलावर चर्चा होऊन एकमत होणे आवश्यक आहे. मी चर्चेसाठी तयार आहे. कार्यकर्त्यांची मते विचारात घ्यावी लागतील, असे आरजी प्रमुख मनोज परब यांनी सांगितले.

हेही वाचा