गोवा : शेतातील बांधासाठी दांपत्यासह १४ जणांनी घेतली होती जलसमाधी

लोलये-काणकोण येथील ‘शंकरसतीचो दसरो’ : शंकर वारीक, पत्नी व १२ बांधकऱ्यांच्या आहुतीचे स्मरण

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
02nd October, 07:43 pm
गोवा : शेतातील बांधासाठी दांपत्यासह १४ जणांनी घेतली होती जलसमाधी

काणकोण : लोलये-काणकोण येथील ‘शंकरसतीचो दसरो’ गुरुवारी साजरा झाला. मात्र या दसऱ्यामागची आख्यायिका रोचक आहे. खाऱ्या पाण्यापासून शेतीचे संरक्षण करण्याकरिता बांध उभा राहावा, यासाठी नरबळी हवा असा दृष्टांत झाल्याने दांपत्यासह तब्बल १४ भूमिपुत्रांनी जलसमाधी घेतली होती. कालांतराने या सर्वांना गावकऱ्यांनी देवत्व बहाल केले आणि या कार्यासाठी ज्याने पुढाकार घेतला त्या शंकर वारीक आणि त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ ‘शंकरसतीचो दसरो’ साजरा करण्याचा प्रघात सुरू झाला.

लोलये येथील आताच्या श्री निराकार मंदिराजवळून एक नदी वाहत होती. वर्षानुवर्षे साचलेल्या गाळामुळे या नदीचे एका ओहोळात रुपांतर झाले. त्या ठिकाणी एक बेट तयार झाले. या बेटावर लोकांनी वस्ती केली. शेती, बागायती वसवली. मात्र ओहोळात जवळच असलेल्या समुद्राचे पाणी शिरून शेती, बागायतीचे नुकसान होत होते. हे खारे पाणी कसे रोखावे व शेती, बागायतीची हानी कशी टाळता येईल, हा पेच निर्माण झाला. ग्रामसभा बोलविण्यात आली, तेथे सल्लामसलत झाली. त्यावेळी शंकर वारीक यांनी या ठिकाणी बांध घालून हे पाणी रोखण्याचा विडा उचलला. नंतर १२ जणांना सोबत घेऊन खारे पाणी रोखण्यासाठी बांध घालण्याचे काम सुरू केले. कामात चांगली प्रगती होत होती. शंकर वारीक व सहकारी रात्रंदिवस कष्ट करून बांध उभारण्याचे काम करत होते. मात्र बांधावर भरतीचे पाणी शिरून बांध कोसळत होता. त्यामुळे काय करावे अशी चिंता शंकर वारीक यांना सतावू लागली.

त्याच चिंतेत रात्री झोपले असता, त्यांना स्वप्नदृष्टांत झाला व देवाने नरबळी देण्यास सांगितले. आता नरबळी कोणाचा देणार, हा प्रश्न सतावू लागला. आपले इतर सहकारी, सहधर्मचारिणी यांचा बळी देण्याचा विचार ते करूच शकत नव्हते. त्यामुळे शंकर वारीक यांनी स्वत: बांधावर जाऊन पाण्यात उडी टाकली व जलसमाधी घेतली. बांधाचे काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांच्या निदर्शनास ही गोष्ट येताच त्यांनीही पाण्यात उडी टाकून जलसमाधी घेतली. शंकर वारीक यांची पत्नी या सर्वांना जेवण घेऊन येत होती. त्यांना ही दु:खद बातमी समजताच तिनेही विहिरीत उडी टाकली व ती सती गेली.

माणसाचा झाला देव...


एकूण चौदा जण या घटनेत गावासाठी जीव गमावून बसले. या दु:खद घटनेने गावावर शोककळा पसरली. मात्र त्यानंतर शंकर वारीक व इतर आहुती दिलेल्यांना देवत्व प्राप्त झाले. या सर्वांचा त्याग लक्षात घेऊन सर्व लोक एकत्र झाले व त्यांनी बांधाचे काम पूर्ण केले. ज्यांच्यामुळे हे सर्व झाले, त्या शंकर वारीक यांचे देऊळ बांधून लोक त्यांचे पूजन करू लागले. शंकर वारीक हे वारीकांचे मूळ पुरुष. मात्र या घटनेनंतर ते सर्व गावचे देव झाले. आपल्या कर्तृत्वाने एक माणूस देव बनला. हे बांधकरी लोकांच्या कायम स्मरणात राहिले.

या सर्वांच्या समर्पणाला मानवंदना देण्यासाठी लोलये येथील लोक शंकरसतीच्या देवळात दसरा साजरा करतात. तरंगे गावभर नाचवतात व पूर्ण रात्र जागवतात. त्यांच्या वंशजांसाठी गावातील लोकांनी मोठ्या जमिनी दिल्या. आता ते बांध बदलून कॉंक्रिटचे झाले. पाणी रोखणे व जास्त राहिलेले बाहेर सोडणे एवढेच काम आता राहिले. मात्र देवत्व पावलेले शंकर वारीक व बांधकरी यांचा त्याग ग्रामस्थ आज ही विसरू शकत नाहीत.

श्री निराकार देव राहायला जातात संकर्शा देवळात

माशे येथून बाबरे, लोलये येथे जाताना शंकर वारीक यांचे मंदिर लागते. संकर्शा देऊळ म्हणून ते सुप्रसिद्ध आहे. शंकर वारीक यांनी गावासाठी केलेल्या त्यागाची आठवण म्हणून श्री निराकार देव नवरात्रीत तेथे राहायला जातात. नऊही दिवस त्या ठिकाणी ‘प्रसाद’ होत नाही. प्रसाद घ्यायचा असल्यास श्री संकर्शा देवळात घ्यावा लागतो. नवरात्रीत नऊही दिवस तेथे श्री निराकार देवाचे एक व श्री संकर्शा देवाचे एक अशी दोन तरंगे नाचवली जातात. त्यांना ‘गोंधळ’ असे म्हटले जाते. हा गोंधळ प्रसिद्ध आहे. तो पाहण्यासाठी खूप दुरून लोक येत असतात. दसरोत्सवात तरंगे तेथून गावच्या प्रदक्षिणेला जात असतात. वर्षातील हे दहा दिवस म्हणजे देवत्व प्राप्त करून घेतलेल्या माणसाचे स्मरण करण्याचे दिवस. असा हा वैशिष्ट्यपूर्ण दसरोत्सव आहे.


हेही वाचा