गांधी जयंती, शास्त्री जयंतीनिमित्त गोमंतकीयांना आवाहन
पणजी : भारत व गोवा आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण, नशामुक्त करण्याचा संकल्प करून सर्वांनी त्यासाठी संघटित प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. स्वच्छ, नशामुक्त, कौशल्ययुक्त, तंदुरुस्त भारत घडवणे हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. त्याच धर्तीवर स्वच्छ, नशामुक्त, स्वयंपूर्ण, कौशल्ययुक्त गोवा घडवण्यासाठी गोवा सरकारचेही प्रयत्न सुरू आहेत. यासाठी समस्त गोमंतकीय जनतेने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. गोव्यात माझे घर योजनेअंतर्गत घरे ४ ऑक्टोबरला घरे अधिकृत करून दिली जाणार आहेत. त्यात कोमुनिदाद, मोकासे, आल्वारा या जमिनीवरील घरांचा समावेश असणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
जुने गोवे येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, आमदार राजेश फळदेसाई, जिल्हा पंचायतीचे सदस्य धाकू मडकईकर, माजीमंत्री निर्मला सावंत, माजी आमदार धर्मा चोडणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले की, स्वच्छ, आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण गोवा घडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाअंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबवण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. स्वच्छ, विकसित ग्राम, स्वयंपूर्ण गोवा बनवण्यासाठी प्रयत्न सफल होत आहेत. स्वयंपूर्ण गोवा बनवण्यासाठी तयार केलेल्या स्वयंपूर्ण गोवा योजनेला ५ वर्षे पूर्ण होत असून, चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्वयंपूर्णमित्र दर शनिवारी नगरपालिका, पंचायतींत जाऊन लोकांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यांना स्थानिक पंचायती, नगरपालिका यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या ८० टक्के तर राज्य सरकारच्या १०० टक्के योजना सर्वांपर्यंत पोचवणे शक्य झाले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
गोवा हे पर्यटन राज्य असल्याने पर्यटक आकर्षित व्हावेत यासाठी स्वच्छता राखण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
....