पणजी : एकेकाळी अनेक गोष्टी आयात करणारा गोवा आता स्वयंपूर्ण बनला आहे : मुख्यमंत्री डॉ. सावंत

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
02nd October, 03:24 pm
पणजी : एकेकाळी अनेक गोष्टी आयात करणारा गोवा आता स्वयंपूर्ण बनला आहे : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी : केंद्राच्या आत्मनिर्भर भारतप्रमाणे गोव्यात स्वयंपूर्ण गोवा अभियान सुरू करण्यात आले. याद्वारे स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यात आले. यामुळे एकेकाळी अनेक गोष्टी आयात करणारा गोवा स्वयंपूर्ण बनला आहे. विविध क्षेत्रात आज गोवा स्थानिक उत्पादने निर्यात करत असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. गुरुवारी गांधी शिल्प बाजारच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार आंतोनियो वास उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आपण सर्वांनी स्थानिक उत्पादकांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. गांधी जयंती निमित्त आयोजित प्रदर्शनात प्रत्येकाने किमान एक खादी कपडा विकत घ्यावा. यामुळे हस्त कलाकारांना आणखी उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहन मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत सुरू केल्याने आज अनेक कारागिरांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे. हस्तकलाकारांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी येत आहे. 

महात्मा गांधीनी स्वच्छता, स्वयंपूर्णता, अंत्योदय आदी बाबत विचार मांडले होते. मात्र मागील अनेक वर्षे याबाबत काही झाले नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर या कल्पनांवर प्रत्यक्षात काम सुरू झाले. महात्मा गांधी नंतर नरेंद्र मोदी हे एकमेव राजकीय नेते आहे ज्यांनी रस्त्यावर उतरून झाडू हातात घेतला. लोकल फॉर व्होकलमुळे स्थानिक उत्पादकांना सन्मान मिळाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

स्थानिक हस्तकलाकारांना प्रोत्साहन देणार 

मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले की, उद्योग खात्यातर्फे स्थानिक हस्तकलाकारांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी उद्योग खाते आणि खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे एकत्रितपणे प्रयत्न केले जातील. चांगले पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग केल्यास राज्यातील उत्पादनांना आणखी वाव मिळू शकतो.

हेही वाचा