नवरात्र प्रत्येक स्त्रीतील जागृत दुर्गा

अन्यायाविरुद्ध उभी राहताना ती स्वतःचे दुर्गारूप धारण करत असते. कधी कालीसारखी निर्भय, कधी सरस्वतीसारखी ज्ञानदायी, तर कधी अन्नपूर्णेसारखी कुटुंबाची काळजी घेणारी.

Story: नवरात्र |
26th September, 09:47 pm
नवरात्र  प्रत्येक स्त्रीतील जागृत दुर्गा

नवरात्र म्हणजे फक्त नऊ रात्रींचा सण नाही, तर तो स्त्रीशक्तीचा, जीवनशक्तीचा आणि अढळ धैर्याचा उत्सव आहे. देवीच्या नऊ रूपांची पूजा आपण करतो, पण खरी पूजा म्हणजे आपल्या आसपासच्या प्रत्येक स्त्रीतील त्या दुर्गेला ओळखणे. ही दुर्गा फक्त मंदिरे, आरास किंवा आरतीत नाही; ती रोजच्या जगण्यात, रोजच्या संघर्षात जिवंत आहे. जन्माच्या पहिल्याच क्षणापासून मुलीच्या पावलांवर समाजाच्या अपेक्षांची जोखड बसवलं जातं—“मुलगी आहेस, जपून रहा,” असा सततचा इशारा. तरीही तिच्या डोळ्यातील स्वप्नांचा प्रकाश कधीही मंदावत नाही. शिक्षण, करिअर, विवाह अशा प्रत्येक टप्प्यावर “हे तुला जमेल का?” हा प्रश्न तिला उभारी देतो.

आपला समाज परंपरा आणि नवविचारांचा संगम आहे. कुठे अजूनही लिंगनिवड, घरातील निर्णयांमधील स्त्रीची मर्यादित भूमिका अशा जुनाट रुढींची सावली आहे, तर कुठे महिलांसाठी अंतराळाच्या दारापर्यंत खुल्या संधी आहेत. या दोन टोकांच्या मध्ये तोल सांभाळत स्त्री पुढे सरकते कधी परंपरेतील ऊब जपते, तर अन्यायाला ठाम नकार देते. कार्यस्थळी असो वा समाजात, तिला भ्रष्टाचार, भेदभाव, असुरक्षिततेला सामोरे जावे लागते, पण ती हार मानत नाही. अन्यायाविरुद्ध उभी राहताना ती स्वतःचे दुर्गारूप धारण करत असते. कधी उग्र कालीसारखी निर्भय, कधी सरस्वतीसारखी ज्ञानदायी, तर कधी अन्नपूर्णेसारखी कुटुंबाची काळजी घेणारी.

नवरात्रीत आपण ज्या नऊ देवींची आराधना करतो, ती प्रत्येक स्त्रीच्या अंगी दडलेली ताकद आहे. शैलपुत्रीसारखी ती पर्वताप्रमाणे अढळ, ब्रह्मचारिणीसारखी ध्येयवेडी, चंद्रघंटेसारखी सजग, कूष्मांडेसारखी सर्जनशील, स्कंदमातेसारखी ममता जपणारी, कात्यायनीसारखी निडर, कालरात्रिसारखी अंधाराला भेदणारी, महागौरीसारखी शुद्ध आणि सिद्धिदात्रीसारखी मार्गदर्शक आहे. कोमल , प्रखर स्वरूपी ही रूपे तिच्या दैनंदिन श्वासात मिसळलेली आहेत.

आजची स्त्री डॉक्टर आहे, वैज्ञानिक आहे, शेतकरी, शिक्षक, उद्योजिका आहे. डिजिटल युगात तिने आपले स्थान निर्माण केले आहे. घराची चूल आजही तिच्याच मायेने पेटते आणि मंगळावरचा झेंडा देखील तिच्याच जिद्दीने फडकतो. तिच्या यशामागे आहे ती, न संपणारी मेहनत, घर-समाजातील दबाव, अविरत स्वतःच्याच स्वप्नांशी केलेली झुंज.

नवरात्र आपल्याला आठवण करून देते की स्त्री म्हणजे फक्त कोमलता नाही, ती प्रखरता आहे. प्रत्येक मुलगी, आई, बहीण, मैत्रीण, सहकारी या शक्तीच्या वेगवेगळ्या छटा आहेत. तिच्या संघर्षाला मान देणे, तिच्या कर्तृत्वाला सलाम करणे, तिच्या हक्कासाठी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी पूजा, हीच खरी आरती. जेव्हा आपण देवीसमोर दिवा लावतो, तेव्हा प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यातील आशेच्या प्रकाश तेजाळतो.

नऊ रात्रींचा हा सोहळा अखंड चालू आहे, तो तिच्या हृदयात, आपल्या समाजाच्या स्पंदनात. त्या अंतःकरणातील दुर्गेला वंदन करूया, कारण स्त्री हीच शक्ती, स्त्री हीच दुर्गा हेच नवरात्रीचे खरे तत्त्व आहे.


- पल्लवी उल्हास घाडी

विद्यार्थीनी, गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय 

हरमल-गोवा.