गुन्हेगारीचा वाढता विळखा

गुन्ह्यांचं मूळ कारण समाजातील असमानता, शिक्षणातील त्रुटी आणि कायदा-व्यवस्थेतील कमतरता यात आहे. वाढते गुन्हे थांबवायचे असतील तर सरकार, पोलीस, न्यायालय, शिक्षक, पालक आणि सर्वसामान्य नागरिक सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे. केवळ कायदे करून गुन्हे थांबत नाहीत; त्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल घडवावा लागतो.

Story: लेखणी |
26th September, 09:43 pm
गुन्हेगारीचा  वाढता विळखा

मानव समाजाच्या सुरक्षिततेसाठी नियम, कायदे आणि सामाजिक मूल्ये आवश्यक असतात. पण जेव्हा माणूस या सगळ्यांचा भंग करतो, तेव्हा गुन्हे जन्म घेतात. गुन्हा हा केवळ एका व्यक्तीविरुद्ध नसतो, तर संपूर्ण समाजाच्या हिताविरुद्ध असतो. आजच्या युगात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. लहानसहान चोरीपासून ते मोठमोठ्या आर्थिक घोटाळ्यांपर्यंत, सायबर फसवणुकीपासून ते दहशतवादी हल्ल्यांपर्यंत समाज सतत गुन्ह्यांच्या विळख्यात अडकत चालला आहे. त्यामुळेच वाढते गुन्हे हा विषय समाजशास्त्र, राजकारण, अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवन या सगळ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. 

गुन्हे हे दोन प्रकारचे मानले जातात पारंपरिक आणि आधुनिक. पारंपरिक गुन्ह्यांमध्ये खून, दरोडे, चोरी, बलात्कार, अपहरण यांचा समावेश होतो. हे प्रकार प्राचीन काळापासून घडत आलेले आहेत. पण आजच्या युगात याशिवाय आधुनिक गुन्ह्यांचाही मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामध्ये सायबर क्राईम, मोबाईल हॅकिंग, फसवणूक, ऑनलाईन ब्लॅकमेल, ड्रग्सची तस्करी, दहशतवाद, मनी लॉन्ड्रिंग, भ्रष्टाचार यांचा समावेश होतो. समाजातील प्रत्येक घटक या गुन्ह्यांचा बळी ठरतो आणि सुरक्षिततेचा भंग होतो. 

गुन्ह्यांची मुळे समाजातील असमानता, शिक्षणातील त्रुटी आणि कायद्याच्या कमतरतेत दडलेली आहेत. सर्वप्रथम कारण म्हणजे बेकारी आणि गरिबी. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे तरुण चुकीच्या मार्गाला लागतात. पैशासाठी ते चोरी, दरोडे, खंडणीसारख्या गुन्ह्यांकडे वळतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शिक्षणातील मूल्यांचा अभाव. आज शिक्षण केवळ नोकरी मिळवण्यासाठी झालं आहे. प्रामाणिकपणा, जबाबदारी, सहकार्य यांसारख्या मूल्यांची जोपासना होत नसल्यामुळे तरुण पिढी भलत्याच मार्गाने जाते.

तिसरे कारण म्हणजे व्यसनाधीनता. दारू, सिगारेट, गांजा, ड्रग्स या व्यसनांमुळे गुन्हेगारी वाढीस लागते. व्यसनासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी व्यक्ती चोरी, दरोडा किंवा अमली पदार्थांची विक्री करते. चौथं कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा गैरवापर. मोबाईल आणि इंटरनेटमुळे ज्ञानाचं दार उघडलं असलं तरी त्याचाच गैरवापर करून ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग, अश्लील व्हिडिओ पसरवणे, ब्लॅकमेल अशा प्रकारे अनेक गुन्हे घडत आहेत. पाचवं कारण म्हणजे कायदा आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटी. भारतात गुन्हा घडल्यावर त्याला शिक्षा मिळायला अनेक वर्षं जातात. खटले वर्षानुवर्षे अडकून पडतात. त्यामुळे गुन्हेगार निर्भय होतो. कायद्याची कडक अंमलबजावणी न झाल्यामुळे गुन्हेगारी वाढते. सहावं कारण म्हणजे माध्यमं आणि चित्रपटांचा प्रभाव. काही चित्रपटांत गुन्हेगारांना नायक दाखवलं जातं, त्यांना ग्लॅमराइज केलं जातं. याचा परिणाम तरुणांच्या मानसिकतेवर होतो आणि ते चुकीच्या मार्गाकडे आकर्षित होतात.

शेवटी, शहरीकरण आणि स्थलांतरामुळेही गुन्हेगारीला खतपाणी मिळालं आहे. मोठ्या शहरांत रोजगाराच्या शोधात लाखो लोक जमतात. गर्दी, स्पर्धा, दडपण, असमानता या गोष्टींमुळे असुरक्षितता वाढते आणि गुन्हेगारीला वाव मिळतो. गुन्ह्यांचे स्वरूप फार व्यापक आहे. महिलांविरुद्धचे गुन्हे बलात्कार, कौटुंबिक हिंसा, लैंगिक छळ  दिवसेंदिवस वाढताना दिसतात. बालकांविरुद्धही अत्याचार, अपहरण, बालमजुरी हे गंभीर प्रश्न आहेत. त्याशिवाय सायबर गुन्ह्यांचे प्रमाण तर धोकादायकरीत्या वाढलं आहे. बँक फसवणूक, ओटीपी फसवणूक, मोबाईल हॅकिंग यामुळे लाखो लोक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतात. भ्रष्टाचार, घोटाळे, मनी लॉन्ड्रिंग हे आर्थिक गुन्हे देशाच्या प्रगतीला अडथळा आणतात.

अंमली पदार्थांचा व्यापार, दहशतवाद, अवैध वृक्षतोड, वाळू तस्करी यांसारखे गुन्हे केवळ समाजालाच नाही तर पर्यावरणालाही मारक आहेत. कौटुंबिक वादातून होणारे खून, हुंडाबळी यांसारखे प्रकारही आजच्या समाजात कमी नाहीत.

वाढत्या गुन्ह्यांचा परिणाम समाजाच्या सर्वच स्तरांवर होतो. सर्वप्रथम भीतीचं वातावरण निर्माण होतं. सर्वसामान्य नागरिक सुरक्षिततेविना राहतो. आपली संपत्ती, आपलं जीवन केव्हा धोक्यात येईल याची खात्री नसते. दुसरं म्हणजे विश्वास हरवतो. माणसामाणसांत परस्पर विश्वास उरत नाही. कोणीही फसवू शकतो ही भावना बळावते. तिसरा परिणाम म्हणजे तरुण पिढीचा नाश. गुन्ह्यात अडकलेला तरुण आयुष्यभर मागे पडतो. चौथा परिणाम म्हणजे आर्थिक नुकसान. चोरी, दरोडे, फसवणूक, भ्रष्टाचार यामुळे केवळ व्यक्तींचंच नाही तर देशाचंही नुकसान होतं. गुन्हेगारी जास्त असेल तर परदेशी गुंतवणूकदार मागे हटतात, पर्यटनाला फटका बसतो, विकास थांबतो. अखेर देशाच्या प्रगतीला अडथळा निर्माण होतो.

गुन्हेगारी रोखण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम मुलांना लहानपणापासूनच मूल्याधिष्ठित शिक्षण देणे गरजेचे आहे. शाळा-कॉलेजमध्ये नैतिकता, प्रामाणिकपणा, जबाबदारी, सहकार्य यांची शिकवण द्यावी. रोजगारनिर्मिती हा देखील एक महत्त्वाचा उपाय आहे. तरुणांना रोजगार मिळाला तर ते चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत.

याशिवाय कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. गुन्हेगाराला त्वरित शिक्षा मिळाली पाहिजे. न्यायालयीन प्रक्रियेला गती दिली पाहिजे. व्यसनमुक्ती अभियान राबवून दारू, ड्रग्स, गांजा यावर कठोर कारवाई करावी. सायबर सुरक्षा बळकट केली पाहिजे. नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवावी आणि जागरूक राहावे. माध्यमांनी व चित्रपटसृष्टीनेही जबाबदारीने वागून गुन्हेगारीचे आकर्षण वाढवणारे संदेश देऊ नयेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनीही पुढे यायला हवं. गुन्ह्यांविरुद्ध तक्रार करणं, पोलिसांना मदत करणं, समाजात जागरूकता निर्माण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

गुन्ह्यांचं मूळ कारण समाजातील असमानता, शिक्षणातील त्रुटी आणि कायदा-व्यवस्थेतील कमतरता यात आहे. वाढते गुन्हे थांबवायचे असतील तर सरकार, पोलीस, न्यायालय, शिक्षक, पालक आणि सर्वसामान्य नागरिक सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे. केवळ कायदे करून गुन्हे थांबत नाहीत; त्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल घडवावा लागतो.

आज जर आपण गुन्ह्यांना आळा घालू शकलो नाही, तर उद्या सुरक्षित समाज हा केवळ स्वप्न उरेल. म्हणूनच आपण सर्वांनी जागरूक, जबाबदार आणि प्रामाणिक राहणं आवश्यक आहे.

“गुन्हेगारीला आळा, सुरक्षिततेला बळकटी – हाच आजच्या काळाचा संदेश आहे."


- सिध्दी ह. धारगळकर

धारगळ, पेडणे