आजच्या धावपळीच्या युगात विविध जीवनशैली-संबंधित आजार वाढत चालले आहेत, त्यामध्ये हार्मोन्सशी संबंधित विकारांचे प्रमाणही लक्षणीय आहे. यापैकी अनेक वेळा सौम्य लक्षणांमुळे दुर्लक्षित होणाऱ्या आजारांमधील एक म्हणजे हाशिमोटो थायरॉईडायटीस. हा आजार विशेषतः महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो आणि वेळेवर निदान व उपचार न झाल्यास तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
थायरॉईडचे काय कार्य असते?
थायरॉईड ही मानेच्या पुढच्या बाजूला त्वचेखाली स्थित एक लहान, फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते. ती अंतःस्रावी प्रणालीचा एक भाग असते आणि थायरॉईड संप्रेरक सोडते. थायरॉईड ग्रंथीचे मुख्य काम चयापचय गतीवर नियंत्रण ठेवणे असते. आपण जे अन्न खातो ते शरीर उर्जेमध्ये कसे रूपांतरित करते याची ही प्रक्रिया आहे व ही प्रक्रिया शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम करते.
हाशिमोटो थायरॉईडायटीस रोग काय आहे?
थायरॉईड ग्रंथीशी संबंधित अनेक विकारांपैकी हाशिमोटो थायरॉईडायटीस हा एक महत्त्वाचा आणि लक्ष देण्यासारखा आजार आहे. ही एक दीर्घकालीन ऑटोइम्यून स्थिती आहे, ज्यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती चुकीच्या पद्धतीने थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करते आणि त्यामुळे शरीरातील थायरॉईड हॉर्मोन्सचे उत्पादन कमी होते म्हणजेच हायपोथायरॉईडीझमची स्थिती होते.
महिलांमध्ये अधिक का आढळतो?
संशोधनानुसार, महिलांमध्ये ऑटोइम्यून विकार होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा ७ ते १० पट अधिक असते. यामागे हार्मोनल बदल, गरोदरपण, रजोनिवृत्ती आणि अनुवंशिकता हे घटक कारणीभूत असू शकतात. ३० ते ५० वयोगटातील महिलांमध्ये हा आजार सर्वाधिक प्रमाणात आढळतो.
हाशिमोटो थायरॉईडायटीसची कारणे
अनुवंशिकता – कुटुंबात थायरॉईड विकार असलेल्या व्यक्ती असल्यास हाशिमोटो होण्याची शक्यता वाढते.
हार्मोनल बदल – गरोदरपणा, प्रसूतीनंतरचा काळ आणि रजोनिवृत्तीमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे ऑटोइम्यून आजार सुरू होऊ शकतो.
सभोवतालचे घटक – जास्त आयोडीनचे सेवन, व्हायरल इन्फेक्शन आणि स्ट्रेस हे देखील कारणीभूत ठरू शकतात.
इतर ऑटोइम्यून आजार – टाईप १ डायबिटीज, ल्युपस, रुमेटॉईड आर्थरायटीस अशा आजारांमुळे हाशिमोटो होण्याची शक्यता वाढते.
हाशिमोटो थायरॉईडायटीसची लक्षणे
याची लक्षणे हळूहळू दिसून येतात आणि इतर सामान्य त्रासांसारखी वाटतात, त्यामुळे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. यामध्ये पुढील लक्षणे दिसतात:
सतत थकवा व शरीराची ताकद कमी वाटणे
वजन वाढणे
चेहऱ्यावर सूज येणे
त्वचा कोरडी आणि खरखरीत होणे
केस गळणे किंवा पातळ होणे
थंडी सहन न होणे
मासिक पाळीमध्ये अनियमितता किंवा जास्त रक्तस्राव
लक्ष केंद्रित करण्यात अडचण
मूड स्विंग्स किंवा नैराश्य येणे
निदान कसे होते?
हाशिमोटो थायरॉईडायटीसचे निदान प्रामुख्याने रक्त तपासणीवर आधारित असते. यामध्ये टी.एस.एच, टी3, टी4, आणि विशेषतः एन्टी टीपीओ अँटीबॉडीज यांची पातळी तपासली जाते. अँटीबॉडीजची पातळी जास्त असणे म्हणजे शरीर थायरॉईड ग्रंथीवर आक्रमण करत आहे, हे दर्शविले जाते.
उपचार काय असतात?
हाशिमोटो थायरॉईडायटीस ऑटोइम्यून विकार असल्याने यावर थेट उपाय नाही. पण हायपोथायरॉईडीझमवर नियंत्रण ठेवण्यासाठी थायरॉईड हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते.
यामध्ये रोज लेव्होथायरॉक्सिन नावाचे औषध घेतले जाते, जे शरीरात कमी असलेल्या थायरॉईड हॉर्मोनची कमतरता पूर्ण करते.
महिलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम
हाशिमोटो थायरॉईडायटीसचा महिलांच्या आयुष्यावर विविध प्रकारे परिणाम होऊ शकतो:
गर्भधारणेस अडचण – योग्य उपचार न झाल्यास गर्भधारणा होण्यास अडचणी येऊ शकतात.
गर्भधारणेदरम्यान धोका– अनियंत्रित थायरॉईड हॉर्मोन्समुळे गर्भवती महिलांना गर्भपात, प्रीटर्म डिलिव्हरी यासारखे धोके वाढू शकतात.
मानसिक आरोग्यावर परिणाम – नैराश्य, चिडचिडेपणा, लक्ष न लागणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
रजोनिवृत्तीनंतरची लक्षणे तीव्र होणे – थकवा, हाडांची झिज यासारखी लक्षणे वाढू शकतात.
नियंत्रण आणि जीवनशैलीतील बदल
योग्य औषधोपचार घेणे आणि नियमित तपासण्या करून टीएसएच पातळीवर नियंत्रण ठेवणे.
संतुलित आहार घेणे – आयोडीन, सेलेनियम, झिंक यांचा आहारात समावेश करणे.
ताण कमी ठेवणे, योग-प्राणायामाचा अवलंब.
झोपेची गुणवत्ता सुधारणे.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे.
हाशिमोटो थायरॉईडायटीस हा आयुष्यभर साथ देणारा आजार असला तरी योग्य उपचार, जागरूकता आणि जीवनशैलीत सुधारणा आणल्याने महिलांना एक आरोग्यदायी, सक्षम आणि सक्रिय आयुष्य जगता येऊ शकते. त्यामुळे कोणतीही शंका वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा – कारण लक्षात ठेवा...वेळेवर निदान हीच सर्वोत्तम काळजी!