PCOS: शरीरापलीकडचं मनाचं रणांगण

पी.सी.ओ.एस म्हणजे फक्त एक वैद्यकीय आजार नाही. तो शरीराच्या सोबत मनालाही भिडतो. आणि मनाला जर समजूत मिळाली, तर शरीरालाही औषधांइतकाच आधार मिळतो. औषधं घ्यायचीच आहेत. डॉक्टर औषधं देतात, आहार बदलायला सांगतात, व्यायाम सुचवतात आणि ते आवश्यकही आहे.

Story: मनी मानसी |
26th September, 09:39 pm
PCOS: शरीरापलीकडचं  मनाचं रणांगण

स्त्रियांच्या आजारांची यादी पाहिली तर आजकाल सर्वाधिक चर्चेत असलेला ‘स्टार आजार’ म्हणजे पी.सी.ओ.एस. हल्ली ह्या आजाराविषयी ऐकलं की आपल्याला लगेच वजन वाढणं, मासिक पाळी बिघडणं, त्वचेवर पुटकुळ्या येणं हीच चित्रं डोळ्यासमोर उभी राहतात. पण या शरीराच्या गोंधळामागे मनाचा जो गोंधळ दडलेला असतो, त्याची कुणालाच फारशी कल्पना नसते. डॉक्टर औषधं देतात, हार्मोन्सचे अहवाल पाहतात, पण या सगळ्या प्रक्रियेत “तिच्या मनातल्या कोलाहलाचं काय?” हा प्रश्न मात्र मागे पडतो.

पी.सी.ओ.एस म्हणजे फक्त पाळी बिघडते, एवढं ह्याचं समीकरण सोपं नाही. ह्यात हार्मोनल असमतोलामुळे शरीरात होणाऱ्या रासायनिक चढउतारांचा परिणाम थेट मेंदूवर होतो. अचानक काही कारण नसताना चिडचिड होते, एखाद्या छोट्याशा गोष्टीवर राग उफाळून येतो. सेरोटोनिनची घसरण झाली की मूड खाली, चिडचिड वर. क्षुल्लक कारणाने अश्रू ढाळले जातात, एखादं वाक्य मनाला इतकं लागून राहतं की झोपच उडून जाते. 

कुटुंबावर उमटणारे ठसे

घर म्हणजे माणसांची जुळवाजुळव. आणि तिथं एखादी स्त्री जेव्हा स्वतःशीच जुळवून घेण्यात थकते, तेव्हा तिचं कुटुंबही या वादळात ओढलं जातं. मुलं आईला रोज हसतमुख बघायची सवय लावून घेतात. त्यामुळे अचानक आई कायम तणावाखाली दिसली, रडली वा चिडली तर त्यांना कळत नाही काय घडलंय. पतीला वाटतं, “काल सगळं ठिक होतं, आज अचानक एवढा वाद कशाला?” दुसरीकडे आपण आपल्या आईला ही उगाचच उलटसुलट बोलून जातो. 

सामाजिक पातळीवर बघितलं तर ‘बायका तर तशाच असतात, फारच इमोशनल!’ असा शिक्कामोर्तब केला जातो. पण मानसशास्त्रीय दृष्टीने पाहिलं, तर ही भावनिक उलाढाल ही शरीराच्या रसायनांची भाषा असते. ही भाषा समजून घेणं, स्वीकारणं आणि त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.

ताण : कारणही, परिणामही!

पी.सी.ओ.एस.चं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ताण ह्या गोष्टीशी याचं घट्ट नातं. आधीच्या जीवनशैलीतील ताण पी.सी.ओ.एस वाढवतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या लक्षणांनी आणखी ताण वाढतो. हे चक्रव्यूह जरा भीषणच आहे.

एखादी मुलगी रोज सकाळी उठून आरशात आपल्या चेहऱ्यावरची मुरूमे न्याहाळते, तिचे केस गळताहेत, वजन वाढतंय आणि अशाने तिच्या मनात कुठेतरी एक हतबल खड्डा तयार होत जातो. सतत ताणाखाली असताना शरीरातील ‘कॉर्टिसोल’ हा स्ट्रेस हार्मोन वाढतो आणि पी.सी.ओ.एस असलेल्या महिलांमध्ये हा मानसिक ताण अधिक वाढलेला दिसतो ज्यामुळे असंख्य मानसिक त्रासाला ही त्यांना सामोरे जावे लागते. तिच्या अवचेतन मनात आधीपासून असलेले काही ताण हे पी.सी.ओ.एस मुळे अजून तीव्र होतात. आणि इथून सुरू होतो मूड स्विंग्स, आत्मविश्वासाचा अभाव, कधी कधी नैराश्यापर्यंतचा प्रवास.

उपाय कुठं शोधायचा?

पी.सी.ओ.एस म्हणजे फक्त एक वैद्यकीय आजार नाही. तो शरीराच्या सोबत मनालाही भिडतो. आणि मनाला जर समजूत मिळाली, तर शरीरालाही औषधांइतकाच आधार मिळतो. औषधं घ्यायचीच आहेत. डॉक्टर औषधं देतात, आहार बदलायला सांगतात, व्यायाम सुचवतात आणि ते आवश्यकही आहे. 

परंतु पी.सी.ओ.एस असलेल्या स्त्रीला स्वतःबद्दल अपराधीपणाची, अपूर्णतेची भावना सतत सतावत असते. अशावेळी, योग्य समुपदेशन तिला “तुझं मन ऐकून घेणं हाच उपचाराचा पहिला टप्पा आहे” हे पटवून देतं. 

“हो, तुला कारण नसताना राग येतोय. ही चिडचिड तुझी चूक नाही, ही तुझ्या शरीराची भाषा आहे आणि हे तुझ्या चुकांमुळे नाहीये.”

हे ऐकण्याची गरज असते. कारण अशावेळी स्त्रियांना स्वतःलाच दोष देण्याची सवय असते.

समुपदेशनामुळे आपण हळूहळू स्वतःच्या भावना ओळखायला शिकतो. 

मूड स्विंग्सवर लक्ष ठेवण्यासाठी जर्नलिंग हा एक साधा उपाय मदत करेल. 

कौटुंबिक संवाद सुधारण्यासाठी फॅमिली सेशन्स घ्यावेत. जिथे घरच्यांना कळतं की “ही चिडचिड ही तिची इच्छा नाही, तर ही एक जैविक व मानसिक प्रक्रिया आहे.”

शिवाय ताण व्यवस्थापन, रिलॅक्सेशन टेक्निक्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला स्वीकारणं हे सगळं समुपदेशनाद्वारे शिकायला मिळतं.

त्यामुळे पी.सी.ओ.एस.ही फक्त शारीरिक आजारपणाची कहाणी नाही. तर ती आजच्या स्त्रीच्या मनाची, तिच्या आत्मसन्मानाची, तिच्या नात्यांची आणि समाजाने लावलेल्या अपेक्षांचीही कथा आहे. शरीरावर डॉक्टर काम करतील, पण मनावर काम करायला हवी ती खरी जाणीव आणि संवेदनशीलता.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४