म्हणूनच, केवळ 'नवरात्रोत्स'वातच नाही, तर प्रत्येक दिवशी स्त्रीचा सन्मान करणे आवश्यक आहे. कारण ती केवळ देवी नाही, ती सृष्टीची निर्माती आहे. तिच्यातली शक्ती ओळखली, तर समाज प्रगतीच्या मार्गावर नक्कीच पुढे जाईल.
तीअसते आधारस्तंभ
ती असते सगळ्यांचे बळ
तिच्याविना जीवन अर्थहीन
म्हणूनच, ती नारी असते सदैव अमर...
स्त्री म्हणजे कष्ट, प्रेम, माया आणि संघर्ष यांना सामावून घेत जीवन जगणारी बळकट अशी 'नारी'. तिच्याशिवाय घरातील कामं अपूर्ण राहतात. एक मुलगी म्हणून स्वतःच्या जबाबदाऱ्या निभावत असताना तसेच लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाऊन स्वतःच्या जबाबदाऱ्या तितक्याच जिद्दीने निभावणारी ती महान स्त्री असते. स्त्री म्हटली की डोळ्यापुढे उभा राहतो तो तिचा आत्मविश्वास. कारण आत्मविश्वासाच्या बळावर प्रत्येक स्त्री स्वतःची कार्ये अगदी पूर्णपणे पार पाडते. अशा बहुआयामी स्त्रीचा सन्मान समाजाने रोज केला पाहिजे.
स्त्रियांचा सन्मान करणारा, तिच्या कार्याचा गौरव करणारा असाच एक सण म्हणजे 'नवरात्रोत्सव'. चतुर्थी संपताच आपल्याला चाहूल लागते ती 'नवरात्र' या उत्सवाची. कारण हा नऊ दिवसांचा उत्सव दुर्गा देवीच्या नऊ रूपांनी साजरा केला जातो. त्यामुळे समाजातील प्रत्येक नारी या उत्सवाची मानकरी ठरते. दुर्गा देवी नऊ दिवसांमध्ये नऊ रुपे धारण करते. देवीच्या सर्व रुपांचा संबंध हा समाजातील प्रत्येक स्त्रीशी निगडित आहे. अर्थातच, 'स्कंदमाता' हे रूप वात्सल्य आणि मातृत्वाच्या शक्तीचे दर्शन घडविते. म्हणजेच, प्रत्येक नव जीवाची सुरुवात ही एका स्त्रीच्या गर्भातून होते. आपल्या संघर्षातून एक स्त्री स्वतःच्या मुलाला मातृत्वाच्या भावनेने वाढवते. अवघ्या जगाची निर्मिती ही एका स्त्रीच्या हातून घडते. त्यामुळे अशा शक्तीचे श्रेय समाजातील प्रत्येक स्त्रीला जाते. त्याचप्रमाणे 'कात्यायनी' हे जे देवीचे रूप आहे त्यातून दृष्टांचा नाश करणाऱ्या देवीच्या शक्तीचे दर्शन घडते. हे रूप समाजातील स्त्रीला फार जवळचे आहे. कारण, ज्यावेळी एका स्त्रीवर अन्याय, अत्याचार होतो त्यावेळेस त्या अडचणीतून जाणारी स्त्री स्वतःच्या बळावर, व स्वतःच्या दृढ निश्चयाने त्या दृष्टांचा नाश करते. अशाप्रकारे, देवीची अनेक रूपे आहेत ज्याचा संबंध समाजातील प्रत्येक स्त्रीशी निगडित आहे. त्यामुळे, 'नवरात्र' हा सण जितका दुर्गापूजन करण्यास, उत्सवाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम करण्यास महत्त्वाचा आहे तितकाच समाजातील स्त्रियांना एक वेगळी दिशा देणारा हा सण आहे.
'नवरात्र' सणाच्या निमित्ताने जेव्हा आपण देवीच्या नऊ रूपांची उपासना करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण समाजातील नऊ रूपातील नारीचे दर्शन घेतो. घरासाठी स्नेहाची सावली बनणारी, संघर्षांतून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी, अन्यायाविरुद्ध उभी राहणारी स्त्री आपल्या आजूबाजूची ‘देवी’ आहे. म्हणूनच, प्रत्येकाला प्रश्न पडणे गरजेचे आहे की खरोखरच आपण स्त्रियांचा आदर करतो का?
आज अनेक ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या प्रसंगी दुर्गा पूजन केले जाते. या सणाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. अर्थातच, 'दांडिया' या नृत्याला नवरात्रीच्या सणामध्ये महत्त्वाचे असे स्थान असते. हे दांडिया नृत्य मुली आपल्या बळावर व जिद्दीने प्रस्तुत करत असतात. त्यांच्यातील आत्मविश्वास पाहून समाजातील प्रत्येक स्त्रीच्या मनात दृढ विश्वास उद्भवतो. म्हणजेच, 'नवरात्र' हा सण स्त्रियांना बळकट होण्याचे प्रोत्साहन देतो. त्याचप्रमाणे, नाटक, पाककला स्पर्धा, अनेक खेळ या सर्व कार्यक्रमातून स्त्रियांना स्वतःला सादर करण्यासाठी एक जिद्द मिळते. त्यामुळे, 'नवरात्र' हा सण समाजातील प्रत्येक नारीला सशक्त करतो.
आज नारी प्रत्येक ठिकाणी प्रगतीची उंच शिखरे गाठताना दिसते. प्रत्येक स्तरावर आज स्त्रिया आपले नाव कमावत आहेत. आज स्त्री घरातील कामे करताना, कुटुंबीयांना वेळ देताना स्वतःची ओळख विसरत नाही. परंतु आज स्वतःच्या जबाबदाऱ्यांबरोबर स्त्रिया स्वतःची ओळख निर्माण करतात. आजच्या काळात मोठी कार्ये करून स्वतःचे नाव कमावून स्वतःच्या पायावर उभी राहणारी स्त्री महान ठरते. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, आनंदीबाई जोशी या शूर स्त्रियांनी शिक्षण क्षेत्रात, समाज सुधारणा करण्यात अनेक संघर्ष करत बदल केले. अशा सर्व स्त्रियांनी आपल्या कार्यातून यशाची शिखरे गाठली. या सर्व स्त्रिया आपल्या कार्यातून 'ब्रह्मचारिणी' जी ज्ञान आणि अदम्य शक्तीचे रूप आहे आणि 'कुष्मांडा' जी सृजनशील अशा शक्तीचे रूप आहे. अशा शक्तींचे दर्शन घडवितात. या महान स्त्रियांनी आपल्या अमूल्य कार्यातून समाजातील स्त्रियांना सक्षम बनण्याची ऊर्जा दिली आणि म्हणूनच आजही समाजातील स्त्रियांसाठी या स्त्रिया प्रेरणास्थान ठरतात. म्हणजेच, आपण पाहायला गेलो तर असे दिसून येते की समाजातील प्रत्येक स्त्री दुर्गा देवीच्या शक्तीत मिसळलेली आहे. म्हणूनच, कधी ती शांत असते, कधी रागवते, पेटून उठते तर कधी प्रेमाचा वर्षाव करते.
'नवरात्रोत्सव' नऊ रंगांमध्ये साजरा केला जातो. नऊ दिवसात, नऊ रंगांमध्ये देवी अनेक रूपे परिधान करते. प्रत्येक रंग नारीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन घडवितो आणि प्रत्येक रंगांमध्ये 'नारीरूप' चित्रित होते. 'नवरात्र' या सणाचे रंग स्त्रीच्या अनेक रूपांचे प्रतिनिधित्व करते. अर्थातच, 'नवरात्र' हा सण स्त्रीच्या रंगीबेरंगी अशा अस्तित्वाचा गौरव करतो. त्या अनेक रंगीबेरंगी रूपांमध्ये नारीची शक्ती खुलते.
'नवरात्रोत्सव' या सणाच्या निमित्ताने समाजातील प्रत्येक पुरूषाला देखील स्त्रीबद्दल सन्मान असणे गरजेचे आहे. हा सन्मान केवळ एका दिवसासाठी न ठेवता जन्मभर स्त्रियांना त्यांनी चांगली वागणूक दिली पाहिजे. कारण, जर प्रत्येक पुरुषाने स्त्रीला पाठबळ दिले, तिला सन्मानाने जपले तर स्त्री सक्षम व्हायला वेळ लागणार नाही. आज गरज आहे ती, प्रत्येक पुरुषाने स्त्री शक्तीचे भान ठेवण्याची, स्त्रीचा सन्मान करण्याची. कारण सन्मानाच्या सावलीतच ती आपले तेज खुलवते आणि सशक्त समाजाची निर्मिती करते.
समाजातील स्त्रियांचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे. कारण, आपल्या शक्तिशाली बळातून स्त्री उलट वार करू शकते. अर्थातच, ज्याप्रमाणे दुर्गादेवीने 'महिषासुर' या दानवाच्या गर्वाचा वध केला होता. त्याचप्रमाणे, स्वतःवर होणारा अन्याय न झेलता उलट त्यावर वार करणारी स्त्रीशक्ती पेटून उठू शकते.
म्हणूनच, केवळ 'नवरात्रोत्स'वातच नाही, तर प्रत्येक दिवशी स्त्रीचा सन्मान करणे आवश्यक आहे. कारण ती केवळ देवी नाही, ती सृष्टीची निर्माती आहे. तिच्यातली शक्ती ओळखली, तर समाज प्रगतीच्या मार्गावर नक्कीच पुढे जाईल.
त्यामुळे,
नवरात्रोत्सव सण साजरा करा
आनंदाने, उत्साहाने..
प्रत्येक दिवशी स्त्रीचा
आदर करा सन्मानाने..
अपराध जर केलात तर
ती पेटून उठेल रागाने..
कारण, ती नारी म्हणजेच रूप आहे
दुर्गा मातेचे, महिषासुरमर्दिनीचे..
- पूजा भिवा परब
पालये, पेडणे