गोव्यातील इको टुरिझम, निसर्ग, संस्कृती आणि शिक्षणाचा शाश्वत संगम

ही अभ्यासभेट आम्हाला केवळ पर्यटनाचे नव्हे, तर पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व शिकवणारी ठरली. वर्गखोल्यांतील शिक्षणासोबत प्रत्यक्ष निसर्गात शिकण्याचा अनुभव किती वेगळा आणि समृद्ध असतो, हे आम्हाला तेव्हा जाणवले

Story: दुर्बीण |
11th October, 06:12 pm
गोव्यातील  इको टुरिझम, निसर्ग, संस्कृती आणि  शिक्षणाचा शाश्वत संगम

समुद्रकिनारे, सुवर्ण वाळू आणि उत्साही वातावरणासाठी प्रसिद्ध असलेलं गोवा हे राज्य केवळ पर्यटनाचं नव्हे, तर निसर्ग आणि संस्कृतीच्या जैवविविधतेचंही केंद्र आहे. अलीकडच्या काळात गोवा भारतातील आघाडीच्या इको टुरिझम (पर्यावरणपूरक पर्यटन) स्थळांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. या पर्यटनाचा उद्देश केवळ मनोरंजन नसून पर्यावरणाचे संवर्धन आणि स्थानिक लोकांच्या अर्थकारणाला चालना देणे हा आहे. समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे गेले की येथे दाट अरण्यं, नद्या, धबधबे, मसाल्यांची शेती आणि परंपरागत गावे अशी गोव्याची खरी ओळख दिसते.

गोव्यातील इको टुरिझमचा गाभा म्हणजे निसर्गरम्य प्रदेशांचा आनंद घेताना पर्यावरणाचे जतन करणे आणि स्थानिक समाजाला सक्षम बनवणे. पश्चिम घाटापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या भूगोलामुळे गोव्यात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचा अधिवास आहे. भगवान महावीर अभयारण्य, मोले अभयारण्य, खोतीगाव, नेत्रावळी अभयारण्य आणि डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य ही ठिकाणं निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. येथे ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण आणि परिसंस्थेचा अभ्यास करण्याच्या अनेक संधी आहेत. आमच्या एम.एस्सी. वर्गात २०१४ साली आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांच्या नेतृत्वाखाली घेतलेली वाइल्डरनेस आणि स्वप्नगंधा रिझॉर्ट्सला दिलेली अभ्यासभेट ही आमच्यासाठी संस्मरणीय ठरली. पश्चिम घाटातील चोर्ला घाटात वसलेली ही दोन्ही ठिकाणं गोव्यातील इको टुरिझमचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. ही भेट केवळ सहल नव्हती, तर निसर्गसंवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत पर्यटन यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी जिवंत कार्यशाळा होती.

दाट जंगल, खळखळणारे झरे, पक्ष्यांचा गजर आणि पर्वतांच्या कुशीत वसलेली ही रिसॉर्ट्स पर्यावरणपूरक पद्धतीने बांधण्यात आली आहेत. पावसाचे पाणी साठवणे, सेंद्रिय अन्न वापरणे आणि कचऱ्याचे पुनर्वापर यांसारख्या शाश्वत पद्धती इथे काटेकोरपणे पाळल्या जातात.

आमच्या खोल्यांमधून दिसणारा धबधबा हा त्या सहलीचा सर्वात सुंदर अनुभव होता. सतत पडणाऱ्या पाण्याचा आवाज, थंड वारा आणि सकाळच्या सूर्यकिरणांनी उजळलेला तो नजारा म्हणजे जणू स्वप्नवत दृष्य. म्हणूनच त्या ठिकाणाचं नाव ‘स्वप्नगंधा’, स्वप्नांचा सुगंध अगदी सार्थ वाटते. धबधब्यापर्यंतचा ट्रेक हा आणखी एक रोमांचक अनुभव होता. आमचे सर स्वतः आमच्यासोबत होते. स्थानिक मार्गदर्शकांच्या मदतीने आम्ही जंगलातून चालत गेलो. मार्गात अनेक औषधी वनस्पती, कीटक आणि पक्ष्यांचे निरीक्षण केले. शेवटी जेव्हा आम्ही धबधब्याजवळ पोहोचलो, तेव्हा धुक्याने वेढलेल्या खडकांवरून ओघळणारं पाणी पाहून आम्ही सर्वच मंत्रमुग्ध झालो. त्या क्षणी निसर्गाशी आमचा एक अनोखा संवाद घडला.

रिसॉर्टमध्ये मिळालेलं स्थानिक गोवन जेवणही सहलीची आणखी एक आठवणीय गोष्ट ठरली. ताज्या स्थानिक साहित्यांपासून बनवलेले साधे, पण स्वादिष्ट पदार्थ खऱ्या अर्थाने निसर्गाशी जवळीक साधणारे होते. डॉ. कामत यांनी आम्हाला समजावून सांगितले की या रिसॉर्ट्समुळे स्थानिक शेतकरी, स्वयंपाकी आणि मार्गदर्शकांना रोजगाराच्या संधी मिळतात. त्यामुळे पर्यटनातून थेट स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळते.

ही अभ्यासभेट आम्हाला केवळ पर्यटनाचे नव्हे, तर पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व शिकवणारी ठरली. वर्गखोल्यांतील शिक्षणासोबत प्रत्यक्ष निसर्गात शिकण्याचा अनुभव किती वेगळा आणि समृद्ध असतो, हे आम्हाला तेव्हा जाणवले. आज गोव्यात अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे इको टुरिझम वाढवला जात आहे. फोंडा आणि सावई वेरेमधील मसाल्यांची शेती, येथे सेंद्रिय शेतीचा आणि मसाल्यांचा अभ्यास करता येतो. किनारपट्टी भागात मँग्रोव्ह कयाकिंग, डॉल्फिन निरीक्षण, आणि मोरजी व गालजीबागातील ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन प्रकल्प हे समुद्री परिसंस्थेच्या जतनाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत.

२०१४ च्या त्या सहलीची आठवण आजही आमच्या मनात ताजी आहे — निसर्गाची जवळीक, शिक्षकांचे मार्गदर्शन, आणि गोव्याच्या हिरवाईत घेतलेला तो अनोखा शैक्षणिक अनुभव. त्या सहलीने आम्हाला शिकवले की पर्यटन केवळ मनोरंजन नाही, तर निसर्गाशी जबाबदारीने जोडणारा एक सेतू आहे. आज गोव्यातील इको टुरिझम हे मनोरंजन, शिक्षण आणि संवर्धनाचा सुंदर संगम बनले आहे. ते पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे जाऊन गोव्याच्या खऱ्या आत्म्याशी, जंगले, नद्या, पक्षी, आणि गावसंस्कृतीशी एकरूप होण्याचे आमंत्रण देते. शासन, स्थानिक समाज आणि पर्यावरणप्रेमी पर्यटक यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे गोवा आज शाश्वत पर्यटनाचे आदर्श उदाहरण म्हणून उभा आहे, जिथे निसर्ग आणि माणूस दोघेही एकत्र नांदतात.


डॉ. सुजाता दाबोळकर