तीन महिन्यांच्या बाळाला पोटात घेऊन जीव दिलेल्या या आईचा जीव तळमळत होता. आता कुसुम सूड घेण्यासाठी भटकू लागली. गांजे आणि बोर्डीला जाणाऱ्या दुचाकीस्वारांना ती दिसू लागली. तिचे धड दिसत नसेल, पण आकृती दिसत असे.
सत्तरी हा गोव्यातील निसर्गसंपन्न तालुका. सत्तरीमध्ये अनेक कथा आहेत; लोकांनी आपल्या परंपरा जपून संस्कृतीचे जतन केले आहे. याच सत्तरी तालुक्यातील देणूस हा गाव. देणूस गावातील बहुतेक लोक शेतकरी कुटुंबातील होते; वेगवेगळ्या जातीचे लोक या गावात राहत होते.
त्यातच एक होते राघवचे कुटुंब. राघव हा ब्राह्मण कुटुंबातील मोठा मुलगा होता; त्याच्याकडे देवळाची वरसल होती. त्यांच्या कुटुंबाचा दुधाचा व्यवसाय होता. राघवही कधीकधी गोठ्यात मदतीला जात असे. राघवचे बालपण देणूस गावातच गेले होते. ब्राह्मणवाड्याच्या जरा दूरच्या गावच्या वेशीवर हरिजनवाडा होता. हरिजन लोक शेण देण्यासाठी राघवच्या गोठ्यात बाहेर येत. कधीकधी हरिजनवाड्यावरील मुलीही शेण देण्यासाठी येत होत्या. राघवचे त्यांच्याकडे फारसे लक्ष नसे.
राघवचे वय वीस वर्षांचे होत आले होते. एक दिवस गोठ्यात गुरांना गवत घालताना हरिजनवाड्यावरील कुसुम तिथे आली. तिने पोलका आणि साय म्हणजेच घागरा-चोळी घातली होती. शेण भरताना तिची कंबर मुलायम दिसत होती. राघवची नजर तिच्या कमरेवर गेली आणि तो कुसुमला पाहू लागला. शाळेत शिकताना त्याने कुसुमला खूपदा पाहिले होते, पण तेव्हा ती बारीक आणि बालिश होती. आता ती किशोरवयीन कुमारिका वयाच्या अठराव्या वर्षी खूपच मनमोहक दिसत होती. एरवी न बोलणारा राघव तिच्याशी बोलू लागला. आता हे रोजचेच झाले. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने राघव तिच्याशी बोलायचा.
नकळत कुसुमलाही ते आवडू लागले. आता राघव आणि कुसुम संध्याकाळच्या वेळी माळरानावर भेटू लागले. या भेटी गोड होत्या, पण कोणी पाहील याची भीतीही होती. गाईच्या गोठ्यात कधी हे प्रेम फुलले, कोणालाही कळले नाही. माळरानावर आता त्या भेटीत फक्त शब्द नव्हते, तर उत्तेजित करणारा, हवा-हवासा स्पर्शही होता. कुसुमचे राघववर आणि राघवचे कुसुमवर खूप प्रेम होते. कुसुमने राघवला आपले सर्वस्व मानून त्याला आपले सर्वस्व दिले होते.
पण त्यांना माहीत होते की लोक त्यांच्या नात्याला कधीच स्वीकारणार नाहीत. कारण ती अशा समाजात राहत होती जिथे अजूनही हरिजनांना अस्पृश्यतेने वागवले जात होते. त्यांना घरचा उंबरठा चढू दिला जात नव्हता. त्यांना त्यावेळी नारळाच्या करवंटीतून पाणी किंवा चहा पाजला जाई. कुसुमला हे माहीत होते, पण राघवपासून दूर जाणे म्हणजे मरण, हेही तिला माहीत होते.
माळरानावर झाडीत त्यांची रोजची भेट होऊ लागली. एक दिवस असेच राघवने कुसुमला कवेत घेतले असता राघवच्या काकूंनी त्यांना पाहिले. त्या धावतच घरी गेल्या आणि घरच्यांना सगळे सांगितले. राघवच्या काकूंनी आणि आईने कुसुमच्या कुटुंबालाही ही बातमी कळवली. ती रात्र दोघांसाठी जणू काळरात्र होती. कुसुमच्या बाबांनी तिला झाडाला बांधून खूप मारले. तिला दोन दिवस जेवण दिले नाही. इकडे राघवचे वडीलही खूप रागावले आणि राघवला शहरात पाठवण्याचे त्यांनी ठरवले. राघव तयार नव्हता. त्याला कुसुमला भेटण्याची ओढ लागली होती. तो प्रेमविरहाने व्याकूळ झाला होता. तीच स्थिती कुसुमचीही होती. या दोन दिवसांत कुसुमला जाणवले की तिचे पोट बाहेर दिसत आहे. तीन महिन्यांपासून तिला पाळी आली नव्हती. राघवच्या प्रेमाचे प्रतीक तिच्या पोटात वाढत आहे, हे तिला समजले. ही बातमी गावात कळली तर गावकरी आपल्या कुटुंबाला गावाबाहेर काढतील आणि राघवच्या घरची वरस काढून घेण्यात येईल हेही तिला माहीत होते. ती रडत रडत दिवस काढत होती.
कुसुमला राघवला भेटायचे होते; त्याला सांगायचे होते. म्हणून कुसुमने रात्री राघवच्या गोठ्यात जायचे ठरवले. सुदैवाने राघव गोठ्यातच होता. कुसुमने त्याला कडकडून मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. आपल्या पोटात वाढणारे गोड गुपित कुसुमने राघवला सांगितले. राघव खूप आनंदी झाला, पण प्रश्न होता आता पुढे काय? दोन दिवसांनी रात्री गोठ्यातच भेटायचे असे त्यांनी ठरवले. या दोन दिवसांत राघवने वाळपई बाजारात जाऊन नव्या दोऱ्या आणल्या होत्या. ती रात्र दोघांनी एकमेकांच्या कवेत घालवली आणि सकाळ होण्याच्या पूर्वी दोघांनीही गोठ्यातच वाशाला दोरी लटकवून गळफास लावून घेतला. दोघांचेही घरचे या घटनेने हादरून गेले. पोस्टमार्टम केल्यानंतर कुसुम गरोदर होती ही बातमी सर्वांना कळली.
तीन महिन्यांच्या बाळाला पोटात घेऊन जीव दिलेल्या या आईचा जीव तळमळत होता. आता कुसुम सूड घेण्यासाठी भटकू लागली. गांजे आणि बोर्डीला जाणाऱ्या दुचाकीस्वारांना ती दिसू लागली. तिचे धड दिसत नसेल, पण आकृती दिसत असे. लाकडे आणण्यासाठी जाणाऱ्या बायकांना ती झाडाला उलटी लटकताना दिसे. तो गोठा तर बंदच करण्यात आला. राघवची काकू पाय घसरून पडून गेली. राघवच्या घराला आग लागून खूप नुकसान झाले. अशाप्रकारे कुसुमच्या आत्म्याने देणूस गावात भीतीचे थैमान घातले. कुसुमचे घरचेही घर सोडून गेले, कारण ती घरातही दिसायची. आपल्याला आणि राघवला लग्न करू दिले नाही म्हणून कुसुमने आपला सूड घेतला. शेवटी देवळात प्रसादात तिची माफी मागायला सांगितली. गावाच्या वेशीवर घाडी बोलावून तिची गावकऱ्यांनी मिळून माफी मागितली आणि कुसुमने देणूस गावातल्या लोकांना सतावणे बंद केले.
श्रुती नाईक परब