दिवाळीच्या सुट्टीचा प्रवास

दिवाळीची सुट्टी अजूनही तशीच येते पण आठवणी अजूनही तिथेच आहेत. त्या झाडांच्या सावलीत, त्या चुलीच्या धुरात, आणि त्या जुन्या प्रियांका बसच्या आवाजात.. पण आता पावलं तिथे वळत नाहीत.

Story: आठवणी |
11th October, 06:20 pm
दिवाळीच्या सुट्टीचा प्रवास

आज शेवटचा पेपर झाला, प्रथम सत्र  संपलं. मन एकदम हलकं झालं. आता फक्त आवरायचं, बॅग भरायची आणि दिवाळी अगोदरच्या सुट्टीची मजा घ्यायची. शेवटचा पेपर संपताच आई आम्हाला घेऊन जायची मापश्याला. बस स्टँडवर उतरलो की आई गडबडीत प्रियांका बस शोधायची. तीच एकच बस जायची तिकडे. बसमध्ये बसलो की आम्ही इतके उत्साहित असायचो की कधी एकदा तिथे पोहोचतोय असं व्हायचं.

तेव्हा मोबाईल नव्हते, गेम नव्हते. आम्हाला गप्प ठेवण्यासाठी काहीही नव्हतं. टाईमपाससाठी काही खाणंही नाही. पण आई घरूनच काहीतरी खास बनवून न्यायची. करासवाड्याला पोहोचलो की बस लोकांनी तुडुंब भरलेली असायची. खिडकीतून बाहेर बघताना माझा भाऊ कामगारांकडे बोट दाखवत हसत म्हणायचा, “तू बऱ्यापैकी पास झाली नाहीस ना, तर इथे ये, मी तुला डबा देईन, आणि मग पूर्ण दिवस काम करावं लागेल!” आम्ही सगळे हसून लोटपोट व्हायचो. बसमधून दिसणारे आंब्याचे झाड आणि त्या रांगेतली झाडं आम्ही हसत-खिदळत मोजायचो.

आई आम्हा तिघांना घेऊन एकटी प्रवास करायची. बाबा मात्र कामाच्या ताणामुळे कधी आमच्याबरोबर आलेच नाहीत. संध्याकाळी साडेसहाला बस गावात पोहोचायची. प्रवासाला साधारण एक तास लागायचा. बसमधून बाहेर पाहताना डोंगर, झाडं, आणि वाटेत दिसणारे पाणवठे  सगळं मनात साठवून ठेवायचं.

एक अरुंद रस्ता आला की आम्हाला कळायचं — “आता आमचं स्टेशन आलं!” अर्थात स्टेशन नाही, बसस्टॉप. खाली डोंगरावरून नदी दिसायला लागली की आम्ही खिडकीतून डोकं बाहेर काढायचो. आमचे ‘हिरो’ , तिथेच वाट बघत बसलेले असायचे. आई त्यांच्याकडे बघायची, आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी ती चमक ,ती आजही आठवते.

मग सुरू व्हायचं चढण! त्यानंतर सातिंगणाच्या झाडावर रुतलेले खिळे, आणि त्यांच्याकडे बघून आम्हाला येणारा “भूतांचा वास” – आम्हाला तोच डेंजर झोन वाटायचा! तिथून पुढे निघालो की शाळा कधी दिसणार ह्याच विचारांनी पुढे चालत जायचो, कारण शाळेच्या पाठीमागेच आमचं फेवरेट डेस्टिनेशन असायचं.

आम्ही धावतच तिकडे पोहोचायचो. बाहेर वसऱ्यावर बसलेली ‘ती’ “या या, लाईट ना मरे!” म्हणत दिवा घेऊन आमचं स्वागत करायची. “हातपाय धुया,” म्हणून चुलीपाशी नेऊन कुरवाळायची. त्या क्षणी दिव्याचा उजेड आणि तिच्या चेहऱ्याची ऊब — दोन्ही सारखीच वाटायची. त्या क्षणी असं वाटायचं की जगात यापेक्षा सुंदर ठिकाण दुसरं नाही.

संध्याकाळी सात वाजता चहा, त्याबरोबर मिक्स शेव — तो स्वाद आजही जिभेवर आहे. सकाळी लवकर उठायचं, आणि रानात जायचं. नाचणीचं पीक बघायचं, गोठ्यातल्या गायीला हाक द्यायची, आणि विहिरीचं पाणी काढताना तिचं आणि त्याचं दोघांचं भांडण ऐकायचं.

ते भांडण थांबवायला मी ‘त्याला’ विचारायचे, “मी बायत पडलय जाल्या तू काय करतलय?” आणि तो म्हणायचा, “पडलय काय करून दाखयतय!” मग मी हसून म्हणायची, “देवचार कसो दिसता? तुका केवा मेळलो जाल्या काय करतलय?” आणि तो गंभीर चेहरा करून म्हणायचा, “पाय धरतलय!” — आम्ही सगळे खळखळून 

हसायचो.

कुठेही साप दिसला तर तोंडावर बोट ठेवून खूण करायचे — “गप्प बसा” म्हणून. “त्याला जाऊ द्या त्याच्या वाटेने,त्यांना नुकसान होऊ देऊ नका,” असं ते नेहमी सांगायचे. त्या साध्या शब्दांतही शिकवण दडलेली असायची.

परीक्षा संपली की ते नेहमी म्हणायचे — “परीक्षा संपल्या तरी मध्ये मध्ये थोडं वाचत जा, एकमेकांना प्रश्न विचारत जा.” आणि ‘ती’ एक अक्षरही न शिकलेली,असं असूनही तिचं समजून सांगणं, तिचं मनापासून शिकवणं — सगळं विलक्षण होतं. ती नेहमी म्हणायची, “तू शिक्षिका हो, मग मी येईन तुझ्या वर्गात, मागच्या बाकावर बसून ऐकीन तुझं शिकवणं.”

“रविवारी व्होड्येक बरा नुसत्याक लागला” हे कळताच ‘तो’ धावत जायचा काळे खुबे, आणि  मासळी घेऊन यायचा. सोमवार आला की घरभर  कुळटाची पीठीचा सुगंध, कधीतरी तवसोली कधी खरवस — त्या सुगंधाने सगळं घर भरून जायचं. घरी परत येताना भूक लाडू तान लाडू नाही.. पण मुगाचे लाडू, साखरेची कापा आणि भरभरून प्रेम घेऊन यायचो.

तेव्हा आम्ही हसायचो, खेळायचो, आणि जगाच्या गडबडीत हरवलेले क्षण पुन्हा जगायचो. पण आता ते दिवस बदललेत. तरीही ‘प्रियांका’ बस अजूनही तिथेच जाते, गावही फारसं बदललेलं नाही. ती विहीर तशीच आहे, पण नदी मात्र खोल झालेली आहे. मासे तिचे संपले, काळे खुबे हरवले.. खरवस आता आवडत नाही. तिच्या सारखा मला बनवायला झेपत नाही.

दिवाळीची सुट्टी अजूनही तशीच येते पण आठवणी अजूनही तिथेच आहेत. त्या झाडांच्या सावलीत, त्या चुलीच्या धुरात, आणि त्या जुन्या प्रियांका बसच्या आवाजात.. पण आता पावलं तिथे वळत नाहीत. कारण त्या गावात आता माझे आजीआजोबा राहत नाहीत..


स्नेहा बाबी मळीक