आयुष्याची टेस्टमॅच हरलो भाभी पण ते दुःख इथे वन डे खेळून हलकं करतोय. जिंकत चाललोय परत. मुले नाव काढतात आता आश्रमातली.
आमच्या घरात ना, रोज मला एक प्रश्न पडतो की आज संध्याकाळी जेवण काय करायचे? खरोखर बऱ्याच जणांना हसू येईल, काय पण बोलते ही. आम्हाला इतकी टेन्शन आणि व्याप आणि ही एक बोलते की संध्याकाळी जेवण काय करायचे याचं टेन्शन येतं. काहीपण असो पण जे आहे ते असे. खाणारी इन् मिन तीन तोंडे प्लस दोन मनिमाऊ. अर्थात त्यांचे निभून जातेही, पण आमच्या तीन तोंडाचे तीन प्रकार खाण्याबाबत. कोणाला भाकरी हवी, कोणाला पाणीपुरी. शेवटी आज ठरले की संध्याकाली पाणीपुरी करायची. नो जेवण.
पाणीपुरी हा एक सर्वमान्य प्रकार आमचा. मुंबईत अनेक नवीन खाद्यपदार्थ चाखले. करायला शिकले, काही खूप रुचले त्यात पाणीपुरी अव्वलस्थानी. गोव्यात आमच्या लहानपणी पुरी म्हणजे श्रीखंड पुरी आणि सावर्ड्याला लोलीच्या हॉटेलातील गरमागरम पुरीभाजी. मुंबईला आले आणि ओळख झाली पाणीपुरीची. हा एक खरेच वेगळाच प्रकार. एक चटक लागते हो याची. कितीही पाणीपुरी खा, पोट भरतच नाही बघा. असो!
तर संध्याकाळी पाणीपुरीचा बेत तडीस नेला. लेकीने खास वेळ काढून बनवली पाणीपुरी. एकच तोंडात टाकली आणि ह्यांच्या तोंडातून उदगार निघाले सहज, "व्वा! खरेच सुंदर झालीय, शामलालची आठवण झाली."
शामलाल... आम्ही उपनगरात राहावयास आलो, त्रिकोणी कुटुंब, स्वतःचा संसार मग मज्जा करणे आलेच. कधी रविवारी संध्याकाळी जायचे फिरायला. शेवपुरी, पाणीपुरी असायचेच जिभेला खूश करायला. अश्याच एका गाडीवर शामलाल याची ओळख झाली. आता गाडीवर अशासाठी की पाणीपुरी, वडापाव हे प्रकार गाडीवरच खावेत असा संकेत आहे आणि तो तसा खराही आहे. असो! तर हा शामलाल हसतमुख. कधीही जा, सुहास्य स्वागत. “आइये भाभीजी, साहेब कैसे है?” इथपासून सुरुवात आणि स्वभावातली मिट्ठास जणू पाणीपुरीत उतरलीय अशी फर्मास पाणीपुरी. तसे सगळेच पदार्थ सुंदर असत त्याच्या गाडीवर.
हळूहळू ओळख झाली, मग कळले की आमच्या समोरच दोन तीन चाळी होत्या, त्यात तो राहत असे. आमच्यासारखेच त्रिकोणी कुटुंब. पत्नी रतनप्यारी आणि मुलगी. आपल्या मुलीवर शामलाल याचा खूप जीव. आज जे मी कमावतो, ते तिच्यासाठीच असे तो नेहमी सांगे. तिचे शिक्षण मुंबईत करायचे, तिला मोठे करायचे हाच ध्यास घेऊन तर तो परिवाराचा विरोध पत्करून पत्नी व मुलीला घेऊन मुंबईत राहत होता. मी फावल्या वेळात ट्युशन घेते हे कळल्यावर शामलालने आपल्या मुलीला देविकाला माझ्या घरी ट्युशनला पाठवायला सुरुवात केली. तशी लहान असली तरी हुशार होती ती अभ्यासात. शिवाय बापही मुलीकरता काहीही करायला तयार होताच. तसा चार बुकं शिकलेला गडी तो. पण, आता यु. पी. बिहारमध्ये सर्वांच्या बाबत होते तेच शामलालबाबत झाले. मग पडला गळ्यात हा धंदा. पण मुलीला असल्या गोष्टीत ठेवायचे नाही हे पक्के ठरवून त्याचप्रमाणे वाटचाल चालू होती शामलालची. मुलीला ने आण करण्यावरून रतनप्यारीशी ओळख झाली माझी. निरक्षर पण जरा छानछोकीची आवड, त्यात तिचा भाऊ सरकारी नोकरीत होता. त्याची आटोपशीर ड्यूटी, बाबुटाइप कपडे याचे आकर्षण असलेली रतनप्यारी नवऱ्याला जरा कमी मानत असे. अर्थात पैसा असल्याने उघड बोलतही नसे पण जाणवे जरा.
हळूहळू देविका मोठी होऊ लागली. आधी स्कॉलरशिप, मग दहावीला चांगले मार्क्स, मुलीला मेडिकलला सहज प्रवेश मिळाला. शामलाल खूश झाला. जोमाने डबल मेहनत करून शिक्षणासाठी पैसा उभा करत होता. दिवसभर बिचारा धंद्यात बिझी आणि मुलगी कॉलेजनंतर आईच्या सानिध्यात. अर्थात, आईचे गुण येणारच. हळूहळू देविकाला वडिलांचं काम कमीपणाचं वाटू लागलं. तिच्या मैत्रिणींचे वडील नोकरीत, कोणी डॉक्टर, वगैरे. मग आपले वडील पाणीपुरी विकतात याचे तिला वैषम्य वाटू लागले.
प्रथम शामलालला कळत नव्हते. अर्थात मुलगी जरा अंतर ठेऊनच राहत आहे हे त्याच्या लक्षात आले, पण असेल अभ्यासाचा ताण म्हणून तोही गप्प बसला. होता होता रिझल्ट लागला एम. बी. बी.एस.चा. सगळ्या नातेवाईकांना कळले पण इकडे गाडीवर बिझी शामलालला पत्ताच नाही. उशिरा त्याच्या शेजाऱ्याने सांगितले त्याला. खूप वाईट वाटले. ह्यांच्याकडे बोलूनही दाखविले त्याने. पण गप्प राहिला घरात. बाप आणि मुलीतला हा दुरावा वाढतच होता. त्यात पत्नी सतत मुलीची बाजू घेई आणि एकदिवस कॉलेजात होणाऱ्या दीक्षांत समारंभावरून बोलाचाली झाली घरी. लेक समारंभाला आई व मामाला घेऊन गेली. धक्काच बसला शामलालला. आज देविकाला सर्वस्व मानणारा, तिच्याकरिता इतर परिवाराला सोडून मुंबईत आलेला. लेकीवर खूप प्रेम करणारा एक बाप कोसळून गेला. बोलला नाही पण मनात राहिले.
हळूहळू धंद्यात लक्ष लागेना झाले. अर्थात आवक कमी झाली. मग काय शामलालचे घरातील स्थानही डळमळीत झाले. त्यात मुलीचा पगार सुरू झाला, मग काय पाहता. शामलाल एकटा पडला. शेवटी गाडी एकाला चालवायला देऊन एक दिवस खचलेला शामलाल घरातून गेला तो परत आलाच नाही. महिनाभर मायलेकी आरामात होत्या. पण मग लोकांच्या, शेजाऱ्यांच्या दबावामुळे शोधाशोध झाली.
शामलाल सापडला हरिद्वारमध्ये डायरेक्ट एका आश्रमात. त्यांच्या गाववाल्याला भेटला तो. पत्नीने परत घरी येण्याविषयी विनवले त्याला, कारण मुलीच्या लग्नात तरी बापाची गरज होती ना! पण शामलाल बधला नाही. सुखी आहे तो हरिद्वारला. मध्ये आम्ही गेलो होतो. मुद्दाम पत्ता शोधत गेलो भेटायला, सुखात आनंदात दिसला. आश्रमात असलेल्या अनाथ मुलांना जेवण बनवायचे धडे शिकवतो. स्वयंपूर्ण बनवतोय सध्या त्यांना. विचारले आम्ही परत येण्याबाबत. विषण्ण हसला तो म्हणाला, “आयुष्याची टेस्टमॅच हरलो भाभी पण ते दुःख इथे वन डे खेळून हलकं करतोय. जिंकत चाललोय परत. मुले नाव काढतात आता आश्रमातली. आता परत कशाला येऊ?” संध्याकाळी घेऊन गेला हरिद्वार मार्केटमध्ये. एक छोटेसे दुकान ‘शामलाल चाट भंडार’. “आश्रमात माझ्याकडे शिकलेल्या प्रमोदकुमारने चालू केलंय भाभी.” अगदी गर्वाने शामलाल म्हणाला.
सलील कुलकर्णीच्या ‘दमलेल्या बापाची कहाणी’ ज्या शामलालच्या रूपाने आम्ही अनुभवली होती तोच शामलाल परत उमेदीने उभा होता. त्याला जे हवे होते ते त्याने मिळवले घरच्यांकडून नाही, तर दारच्यांकडून नक्की...
- रेशम जयंत झारापकर, मडगाव, गोवा.