दिवाळी हा फक्त फटाक्यांचा उत्सव नाही, तर तो आपल्या अंतर्मनाच्या शुद्धतेचा, आत्मस्वीकृतीचा, आणि भावनिक नात्यांच्या उजेडाचा देखील सण आहे.
दिवाळी आली की सगळं जग उजळून निघतं, घराघरांत आकाशकंदील लागतात व पणतींच्या रांगा जणू आशेचे दीप लावतात. पण, मला नेहमी वाटतं, या प्रकाशोत्सवाचा खरा अर्थ आपण फक्त बाह्य जगापुरताच ठेवतो का? दिवाळीचा गर्भित अर्थ आपल्याला उमगलाय का?
दिवस पहिला : वसुबारस आणि आत्मसंवर्धनाचं मानसशास्त्र
दिवाळीची सुरुवातच होते वसुबारस पासून, जिथे गाईला काळजी, माया व पोषण याचं प्रतीक मानून पूजलं जातं. परंतू वसूबारस म्हणजे ‘nurturing self’ अर्थात आपल्यातील गाईसमान असणारी करुणा, आपुलकी व वात्सल्याची जपणूक होय. कारण, आपलं मनही एका गाईसारखंच असतं! जपलं तर माया व पोषण देतं, परंतु दुर्लक्ष केलं की कोरडं व निष्प्राण पडतं.
दिवस दुसरा : धनत्रयोदशी आणि आत्ममूल्यांची गुंतवणूक
धनत्रयोदशीला लोक धन्वंतरी देवीची पूजा करतात, उदंड आरोग्यासाठी प्रार्थना करतात, सोन्याची देखील खरेदी करतात. पण आपल्या मनाचं सोनं अर्थात आपला आत्मसन्मान, तो आपण किती जपतो? आपण आजही दुसऱ्यांच्या नजरेतच स्वतःला मोजत बसतो का? मानसशास्त्रानुसार self-worth ही प्रत्येक मानसिक आरोग्याची मूलभूत गुंतवणूक आहे. त्यामुळे, ह्या दिवशी, स्वतःवर गुंतवणूक करा व आत्ममूल्यांचं व्याज आयुष्यभर मिळवा. कारण, स्वतःच्या गुणवत्तेचा स्वीकार व सन्मान हीच खरी ‘धनपूजा’ आहे.
दिवस तिसरा : नरक चतुर्दशी आणि अंतर्मनाची स्वच्छता
या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी जसा नरकासुराचा वध केला तसं आपणही आपल्या मनातील नकारात्मकतेचा नाश करायला हवा. ताण-तणाव, अपराधगंड, असुरक्षितता, अपूर्णतेची भावना हेच आपले ‘मानसिक नरकासुर’ होय. त्यामुळे आपण ही ‘मानसिक’ अभ्यंगस्नान करून ही नकारात्मकता संपवणे म्हणजेच आपल्या ह्या मानसिक नरकासुराचा वध!
दिवस चौथा : लक्ष्मीपूजन आणि कृतज्ञतेचा उत्सव
लक्ष्मी ही फक्त संपत्तीची नव्हे, तर शांती व समृद्धीचे देखील एक प्रतीक आहे. विशेष म्हणजे, मला तर लक्ष्मीपूजन ही एक ‘gratitude therapy’ वाटते. कारण, आपल्याकडे लक्ष्मी मातेच्या कृपेने जे आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहणं, मनाला स्थैर्य देतं. “मला अजून मिळालं नाही” या विचाराऐवजी “मला किती काही मिळालंय” या भावनेनेच आपल्या मनात खऱ्या लक्ष्मीचा वास होतो.
दिवस पाचवा : दीपावली पाडवा आणि नात्यांची नव्याने उजळणी
हा दिवस असतो पति-पत्नींच्या नात्यातील प्रेम आणि आदराचा. त्यामुळे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की नाती फक्त गिफ्ट देऊन टिकत नाहीत तर एकमेकांना वेळ देऊन, चार विसाव्याचे क्षण सोबत घालवून फुलवली जातात. प्रत्येक नातं वेळोवेळी revisit आणि renew करावं लागतं.
दिवस सहावा : बलिप्रतिपदा आणि ‘अहं’चा त्याग
राजा बळी अहंकारानं व्यापलेला होता ज्यामुळे भगवान विष्णू ह्यांनी वामनावतार घेऊन त्याच्यां ठेवत नाही. त्यामुळे, जेव्हा आपण हा अहं ओळखून त्याचा त्याग करतो, तेव्हा आपल्या मनातली देवत्वाची दारे आपोआप उघडतात.
दिवस सातवा : भाऊबीज आणि मानसिक संरक्षण
भावा-बहिणीचं नातं म्हणजे ‘secure attachment’, अर्थात एक नि:स्वार्थ बंध. मुळात, ज्यांच्या आयुष्यात कुणीतरी आहे, जो नि:स्वार्थपणे ‘तु लढ, मी आहे’ असं म्हणतो, त्यांचं मन अधिक स्थिर राहतं. त्यामुळे, आपल्या आयुष्यात ही अशी काही नाती असतात जी आपल्या मनाचा पाया मजबूत ठेवतात. आणि अशा नात्यांचा सन्मान हीच खरी ‘भाऊबीज’.
शेवटी, दिवाळी हा फक्त फटाक्यांचा उत्सव नाही, तर तो आपल्या अंतर्मनाच्या शुद्धतेचा, आत्मस्वीकृतीचा, आणि नात्यांच्या सौख्याचा देखील सण आहे. म्हणूनच, या वर्षी दिवाळीला, आपल्या अंतर्मनातल्या पणत्याही उजळवूयात...
- मानसी कोपरे, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा , ७८२१९३४८९४