मासिक चक्रातील चार टप्पे कसे ओळखायचे?

मासिक चक्रातील प्रत्येक टप्पा ही एक संगणित हार्मोनल प्रक्रिया असली तरी, हे टप्पे केवळ कालावधीने नव्हे, तर हार्मोनल बदल, शारीरिक लक्षणे आणि संकेत यांनी ओळखू येतात. टप्पे ओळखण्यासाठी पीरियड ट्रॅकर ॲप्स, बेसल बॉडी टेंपरेचर, योनीस्त्रावाचे निरीक्षण, मुड व एनर्जी पातळी व इतर लक्षणे संकेत यांचा वापर केला जातो.

Story: आरोग्य |
17th October, 09:38 pm
मासिक चक्रातील  चार टप्पे  कसे ओळखायचे?

महिलांच्या शरीरातील मासिक पाळी हे एक नियमितपणे होणारे जैविक प्रक्रियांचे चक्र आहे, जे आपल्या शरीराला गर्भधारणेसाठी तयार करते. मासिक चक्राचा कालावधी साधारण २१ ते ३५ दिवसांचा असतो, पण सामान्यपणे २८ दिवस हे सर्वसाधारण मानले जाते. चक्राच्या सुरुवातीचा दिवस सामान्यपणे पहिला दिवस म्हणजे पाळी सुरू होणारा दिवस मानला जातो. प्रत्येक चक्राच्या दरम्यान, गर्भाशय व अंडाशयात हार्मोन्सची पातळी कमी-जास्त होणे, गर्भाशयाच्या अस्तराची घनता बदलणे, अंड्यांचा विकास होणे यासारखे अनेक बदल होतात. हे बदल ओळखण्यासाठी मासिक चक्रातील चार टप्पे ओळखणे म्हणजेच आपल्या शरीराच्या हार्मोनल प्रक्रियांचे आणि लक्षणांचे निरीक्षण करणे आवश्यक असते. म्हणून आज आपण या टप्प्यांबद्दल जाणून घेऊयात.

मासिक चक्रातील चार टप्पे पुढीलप्रमाणे असतात.

१. मेन्स्ट्रुअल फेज (मासिक रक्तस्रावाचा टप्पा):

याचा कालावधी साधारणतः रक्तस्त्राव सुरू झाल्यापासून संपेपर्यत म्हणजे दिवस १ ते ३–७ दिवस असा असतो. पण काहींना थोडा जास्त किंवा कमी असू शकतो. या दरम्यान गर्भधारणेसाठी अनुकूल असलेले गर्भाशयाचे आतील अस्तर (एंडोमेट्रीयम) तयार झालेले असते. पण गर्भधारणा न झाल्यास हार्मोन (विशेषतः इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन) पातळी खाली येते.  हे हार्मोन कमी झाल्याने गर्भाशयातील रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि एंडोमेट्रीयम अस्तरातील ऊतक निघून बाहेर पडतात आणि योनीतून मासिक रक्तस्रावाद्वारे ऊतक व पदार्थ बाहेर येतात.

मेन्स्ट्रुअल फेजच्या टप्प्यात योनीतून रक्तस्राव, पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कमी ऊर्जा, मूड स्विंग्स (चिडचिडेपणा, अस्वस्थता), स्तनांमध्ये हलके दुखणे यांसारखे संकेत दिसतात. रक्तस्रावाची मात्रा १० ते ८० मिली लिटरपर्यंत सामान्य मानली जाते, जी प्रत्येक स्त्रीसाठी बदलू शकते.

२. फॉलिकुलार फेज (अंडाणु विकासाचा टप्पा)

हा टप्पा मेन्स्ट्रुअल फेजसोबत पहिल्या दिवसापासूनच सुरू होतो व ओव्ह्युलेशनपर्यंत चालतो. म्हणजेच २८ दिवसांचे मासिक चक्र असल्यास दिवस १ ते १४ पर्यंत हा टप्पा असतो.

या दरम्यान, मेंदूच्या हायपोथॅलॅमसमधून जीएनआरएच (गोनाडोट्रोपीन-रीलिजींग होर्मोन) द्वारे सिग्नल पाठवले जाते ज्यामुळे पिट्यूटरी ग्रंथीवर एफएसएच (फॉलिकल स्टीमुलेटींग होर्मोन) उत्सर्जित होते. एफएसएचचे काम असते अंडाशयांमध्ये फॉलिकल्स तयार करणे. साधारण ५ ते २० फॉलिकल्स प्रारंभिक अवस्थेत तयार होतात. पण यापैकी एकच मुख्यरित्या विकसित होतो. त्या फॉलिकल्समधील ग्रॅन्युलोसा कोशिका इस्ट्रोजन तयार करतात. इस्ट्रोजेनच्या वाढीमुळे गर्भाशयाची आतील अस्तर (एंडोमेट्रीयम) निर्माण होण्यास सुरुवात होते ज्याला प्रोलिफरेटीव फेज म्हणतात. 

या टप्प्यात, इस्ट्रोजन वाढल्याने ऊतकांना पोषण मिळते, त्वचा चमकदार वाटू शकते. ऊर्जा व मूड चांगला असू शकतो, योनीत हलका पांढरा चिकट डिस्चार्ज दिसून येऊ शकतो. काही महिलांना हलकी वेदना किंवा ओटीपोटाच्या खालच्या भागात ताण जाणवून येऊ शकतो.

३. ओव्युलेशन फेज (अंडोत्सर्जन टप्पा)

ओव्युलेशन फेज २८ दिवसांच्या चक्रात साधारणपणे चक्राच्या मधोमध दिवस १४ च्या आसपास असू शकतो.

या दरम्यान, इस्ट्रोजनची पातळी जशी वाढत जाते, तशी पिट्यूटरी ग्रंथीतून अचानक एलएच (ल्युटिनायजींग होर्मोन) चे अचानक उत्सर्जन होते. हे उत्सर्जन ओव्युलेशनसाठी ट्रिगर असते. या एलएच उत्सर्जनामुळे, एक परिपक्व अंडे फॉलिकलमधून बाहेर पडते (ओवम) आणि फॅलोपीयन ट्यूबमध्ये प्रवेश करते. शुक्राणूने निषेचित न झाल्यास हे अंडे फक्त १२ ते २४ तास टिकते.

शरीराचं मूलभूत तापमान (बेसल टेंपरेचर) कमी प्रमाणात वाढणे, योनीतून अधिक पातळ, पारदर्शक व अंड्याच्या पांढऱ्या भागासारखा डिस्चार्ज होणे, लैंगिक इच्छा वाढणे, ओटीपोटात एका बाजूला अधोउच्च वेदना किंवा ताण जाणवणे, स्तनात हलकी रुक्षता जाणवणे यासारखी लक्षणे ओव्युलेशन फेज दरम्यान दिसून येतात. ओव्युलेशन फेज ही फर्टाइल वेळ असते; म्हणजेच यादरम्यान गर्भधारणेची शक्यता जास्त असते. या काळात केलेल्या संभोगाने अंड्यासोबत शुक्राणूचे निषेचन (फर्टीलायजेशन) होऊ शकते.

४. ल्यूटीअल फेज (ल्युटीअल / पीतपिंड टप्पा)

हा टप्प्यांचा कालावधी ओव्युलेशनच्या नंतर सुरु होतो आणि मासिक पाळीपूर्वी पर्यंत चालतो व सामान्यतः दिवस १५ ते २८ अशा प्रकाराचा असतो. 

या दरम्यान फॉलिकलद्वारे तयार झालेल्या अंड्याचे ‘रप्चर्ड फॉलिकल’ म्हणजेच तुटलेले फॉलिकल होते व पुढे त्यापासून कोर्पस ल्युटीयम तयार होते. कोर्पस ल्युटीयम मुख्यतः प्रोजेस्टेरोन आणि काही प्रमाणात इस्ट्रोजन उत्सर्जित करते. या हार्मोनमुळे गर्भाशयाची एंडोमेट्रीयम अस्तर स्रवणाऱ्या फेजमध्ये जाते; म्हणजेच गर्भधारणेच्या तयारीसाठी अस्तर अधिक दाट व पोषक बनते. 

जर अंड्याचे फर्टीलायजेशन झाले, तरच कोर्पस ल्युटीयम टिकून राहते आणि हार्मोन तयार ठेवते. पण निषेचन न झाल्यास, कोर्पस ल्युटीयम हळूहळू निकृष्ट (डीजनरेट) होते आणि प्रोजेस्टेरोन, इस्ट्रोजन हार्मोनची पातळी खाली येते. 

हार्मोन कमी झाल्यामुळे, गर्भाशयातील अस्तर पुन्हा तुटते व पाळी सुरु होते व पुढील चक्राची सुरुवात होते. 

शरीराचे मूलभूत तापमान थोडे जास्त राहणे, स्तनांमध्ये जडपणा, सूज किंवा संवेदनशीलता जाणवणे, मूड स्विंग्स, चिडचिड, अस्वस्थता, भूक वाढणे, गोड पदार्थांची इच्छा होणे, थकवा जाणवणे यासारखी पीएमएसची लक्षणे ल्यूटीअल फेजमधे दिसतात. ल्यूटीअल फेजची लांबी स्थिर म्हणजे साधारण १० ते १६ दिवस असणे योग्य असते. ल्यूटीअल फेज खूप लहान असल्यास, त्याला ‘शॉर्ट ल्यूटीअल फेज’ म्हणतात, ज्यामुळे गर्भधारणा कठीण होऊ शकते.

मासिक चक्रातील प्रत्येक टप्पा ही एक संगणित हार्मोनल प्रक्रिया असली तरी, हे टप्पे केवळ कालावधीने नव्हे, तर हार्मोनल बदल, शारीरिक लक्षणे आणि संकेत यांनी ओळखू येतात. टप्पे ओळखण्यासाठी पीरियड ट्रॅकर अॅप्स, बेसल बॉडी टेंपरेचर, योनीस्त्रावाचे निरीक्षण, मुड व एनर्जी पातळी व इतर लक्षणे संकेत यांचा वापर केला जातो. चक्र खूप अनियमित किंवा तीव्र लक्षणे असल्यास, तसेच पीसीओडी, मासिक पाळीसंबंधित इतर व्याधी किंवा गर्भधारणेची तयारी करण्याआधी हे टप्पे समजून घेणे गरजेचे असते. 


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर