प्रकाश, परंपरा आणि प्रेमाचा सण दिवाळी

आजच्या धावपळीच्या जीवनात, दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्व कुटुंबातील लोक जवळ येतात. सर्वजण एकत्र हसतात, खेळतात, गप्पा करतात आणि एकत्र दिवाळीचा आनंद घेतात. हेच दिवाळी सणाचे मुख्य महत्त्व आहे.

Story: ललित |
17th October, 09:59 pm
प्रकाश, परंपरा आणि  प्रेमाचा सण दिवाळी

आला हो आला आनंदाचा सण, 

लहान थोरांना हसवणारा, उत्सुकता देणारा,

स्त्रियांना एकतेने नांदवणारा, 

मुलींच्या हातातून रांगोळीची संस्कृती जपून ठेवणारा,

तेजोमय प्रकाशात सगळ्यांची विघ्ने दूर करणारा, 

असा, आला हो सण...

आश्विन - कार्तिक या मराठी महिन्यांची सुरुवात झाली की येतो प्रकाशाचा आणि आनंदाचा सण म्हणजेच 'दिवाळी'. दिवाळीचा सण हिंदू समाजातील लोकांना उत्साहाचे वातावरण निर्माण करून देतो. हा सण नात्यांतील भावनांना उजाळा देत प्रत्येक व्यक्तीचे जीवन मंगलमय करतो. दिवाळी जवळ येताच प्रत्येक घरामध्ये साफसफाई, रोषणाई, आकाशकंदील आणि महत्त्वाचे म्हणजे फराळ केला जातो. हे सर्व करत असताना घरातील पुरुषांचे एकजुटीने काम करणे आणि स्त्रियांच्या गोड - गोड गप्पा, यामुळे सर्वजण दिवाळी सणाचा आनंद घेत असतात. एकमेकांसोबत कार्य करणे, मिळून मिसळून राहणे, चांगुलपणावर चालून स्वतः चे जीवन मंगलमय करणे. हेच दिवाळी या सणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

दिवाळीची खरी सुरुवात ही वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशा सुंदर दिवसांनी होत असते. या प्रत्येक दिवसाचे आपले असे खास महत्त्व आहे. 

दिवाळी जवळ पोहचताच लहान मुलांना चाहूल लागते ती 'नरकचतुर्दशी' ची. दिवाळीचा सण येण्याच्या एक महिना अगोदर मुले नरकासुर करण्यात मग्न असतात. भगवान श्रीकृष्णाने क्रूर राक्षसाचा वध केला, स्त्रियांना बंदिवासातून सुटका मिळवून दिली. या सर्वाची पार्श्वभूमी आजही मुलांनी जपून ठेवलेली आहे. त्यामुळे आज देखील मुलांमधील संस्कृती आणि एकमेकांसोबतचे नाते टिकून राहते आणि नरकासुराचे दहन करून खरोखर आनंदाने, तेजोमय प्रकाशात दिवाळी साजरी केली जाते.

फराळाशिवाय दिवाळी अपूर्ण असते. प्रत्येक घरात चकल्या, करंज्या, चिवडा, लाडू, पोहे असे फराळाचे पदार्थ तयार केले जातात. हे सर्व फराळाचे पदार्थ करताना घरातील स्त्रियांमधील आनंद, उत्साह टिकून राहतो. आपुलकीने व मायेने केलेल्या फराळाने दिवाळी अगदी जल्लोषात साजरी करण्यासाठी प्रत्येकाला उत्साह मिळतो. आजच्या आधुनिक काळात एकजूटीने काम करण्याची पध्दत हरवत चाललेली दिसते. परंतु जर आपण दिवाळी सणाद्वारे या गोष्टीचा विचार केला तर असे जाणवते की, दिवाळीचा सण प्रत्येक लहान - थोरांना एकजूटीने काम करण्याची संधी देतो. आजच्या काळात महत्त्वाचे म्हणजे दिवाळीचा सण समाजातील माणूसकी जपून ठेवतो.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी 'लक्ष्मीपूजना' चा मुहूर्त असतो. घरामध्ये, दुकानांमध्ये व कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवी लक्ष्मीची पूजाअर्चा केली जाते. सर्वजण एकमेकांच्या घरी देवीचे दर्शन घेण्यास जातात. लाडू, गोड - धोड खाऊ मुलांना दिला जातो. 

दिवाळी सणाचा दुसरा एक महत्त्वाचा दिवस म्हणजे 'भाऊबीज'. असा सण जो भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील प्रेम जपून ठेवतो. या दिवशी भावंडे एकत्र येतात, जुन्या आठवणींना उजाळा देतात आणि नात्याला अधिक घट्ट करतात. भाऊबीज हे नात्यांचे एक साजिरे रूप आहे, जिथे हसणे, खेळणे आणि प्रेम हेच खरे सौंदर्य असते. दिवाळीच्या शुभ दिवसांमध्ये भाऊ - बहिणीचे नाते अधिक प्रेमळ आणि अतूट बनते.

आजच्या धावपळीच्या जीवनात, दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्व कुटुंबातील लोक जवळ येतात. सर्वजण एकत्र हसतात, खेळतात, गप्पा करतात आणि एकत्र दिवाळीचा आनंद घेतात. हेच दिवाळी सणाचे मुख्य महत्त्व आहे. 

अशाप्रकारे, दिवाळी सणाचा प्रत्येक दिवस आनंद, उत्स्फूर्तता आणि माणुसकीने बहरतो. म्हणूनच, आता येणाऱ्या दिवाळीसाठी आपण मनापासून दिवे लावूया, आपल्या घरातच नाही तर आपल्या नात्यांमध्ये, मनामध्ये, समाजामध्ये दिव्यांचा प्रकाश पसरवूया...


- पूजा भिवा परब, पालये, पेडणे