दिवाळी तेव्हाची आणि आजची

पारंपरिक दिवाळीत ज्या आपुलकीचा प्रकाश होता तो आजच्या दिवाळीत पुन्हा उजळवण्याची जबाबदारी आपली आहे. जर आपण आधुनिकतेसोबत पारंपरिक संस्कार जपले, तर दिवाळी केवळ सण राहणार नाही तर ती आपल्या संस्कृतीचा, ओळखीचा आणि भारतीयतेचा जिवंत उत्सव राहील.

Story: प्रासंगिक |
17th October, 09:53 pm
दिवाळी तेव्हाची  आणि आजची

काश द्या पण मनातही उजेड राहू द्या,

दिवाळीच्या प्रकाशात माणुसकीचा दिवा लावा

भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. येथे प्रत्येक सणाला धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक अशा सर्व स्तरांवर मोठे महत्त्व असते. या सणांमध्ये सर्वांत आनंददायी, रंगीबेरंगी आणि प्रकाशमय सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा फक्त एक सण नाही तर तो आनंद, प्रेम, प्रकाश आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

पूर्वी दिवाळी साजरी करण्याची पद्धत अगदी पारंपरिक होती. घरी स्वतः बनवलेले पदार्थ, घरगुती फुले, नैसर्गिक दिवे आणि पारंपरिक कपडे असायचे. आज मात्र काळानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आधुनिकतेच्या लाटेत अनेक गोष्टी बदलल्या, काही हरवल्या आणि काही नव्याने आल्या.

दिवाळीचा उगम प्राचीन काळात झाला आहे. रामायणानुसार भगवान श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तेव्हा अयोध्यावासीयांनी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरी दिव्यांनी उजळवली. त्याच घटनेच्या स्मरणार्थ दिवाळी साजरी केली जाते. 

अनेक राज्यांमध्ये ही सणमाला म्हणून पाच दिवस साजरी केली जाते वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बळीप्रतिपदा आणि भाऊबीज. प्रत्येक दिवसाला वेगळे धार्मिक व सामाजिक महत्त्व आहे.

पारंपरिक दिवाळी साजरी करण्याची पद्धत

पूर्वी दिवाळी साजरी करण्याची पद्धत अत्यंत साधी, घरगुती आणि एकोप्याने भरलेली होती. महिनाभर आधी घरात मोठी साफसफाई सुरू होत असे. झाडणे, धुणे, पांढरपेशी करणे, घराला रंग देणे या सगळ्या कामांत व्यस्त असायचा. नवीन ओल्या मातीच्या चुली, रांगोळ्या, झाडू आणि टुमदार दिवे घरात आणले जात. वसुबारसच्या दिवशी घरातल्या गाईला साज चढवून पूजा केली जात असे. धनत्रयोदशीला सुवर्ण खरेदी केले जायचे. नरक चतुर्दशीच्या दिवशी अंगणात तेल लावून अभ्यंग स्नान केले जाई. चुलीवर उकळलेल्या उटण्याचा सुवास सगळीकडे दरवळत असे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण घर दिव्यांनी उजळलेले असे. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून स्वच्छता, रांगोळी, आंब्याच्या पानांचे तोरण आणि नवीन धान्याचे दाणे वापरले जात. पूजा झाल्यानंतर सर्व कुटुंब एकत्र बसून फटाके फोडत, गाणी म्हणत आणि फराळ खात. बळीप्रतिपदा आणि भाऊबीजेच्या दिवशी बहीण-भावाची भेट, ओवाळणी आणि कौटुंबिक प्रेम दिसून येत असे. फराळ पूर्णपणे घरगुती असे चकली, लाडू, करंजी, शंकरपाळे, चिवडा, अनारसे हे सर्व पदार्थ घरीच बनवले जात. त्या फराळाला आईच्या हातचा स्वाद असायचा.

पूर्वी दिवाळी म्हणजे फक्त आपल्या घरापुरती नव्हे तर संपूर्ण गावाची किंवा वस्तीची सणासुदीची तयारी असे. लोक एकमेकांच्या घरी जात, भेटीवस्तू देत, सुखी रहा अशी शुभेच्छा देत होते. लहान मुले फटाके कमी आणि खेळ जास्त खेळत, मोठ्यांचा आशीर्वाद घेत असत. समाजात एकोपा, प्रेम आणि आपलेपणा जाणवत असे. सणाचा उद्देश फक्त सजावट नव्हता, तर मनातील अंधार दूर करणे, प्रकाश, सद्भावना आणि दानाची भावना जोपासणे हा होता.

आधुनिक काळातील दिवाळी साजरी करण्याची पद्धत

आजच्या काळात दिवाळी साजरी करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. आजची दिवाळी अधिक भपकेदार, बाजारपेठीय आणि तंत्रज्ञानाधारित झाली आहे. घरगुती फराळाऐवजी रेडिमेड पदार्थांची खरेदी होते. लोक घर सजवण्यासाठी एलईडी लाइट्स, इलेक्ट्रिक दिवे, कृत्रिम फुले आणि डिझायनर तोरण वापरतात. स्मार्टफोनच्या युगात शुभेच्छा देण्यासाठी लोक प्रत्यक्ष भेटण्याऐवजी व्हॉट्सअँप किंवा सोशल मीडियावर Happy Diwali स्टेटस टाकतात. पूर्वी जिथे घरातील सर्वजण एकत्र पूजा करायचे, आज अनेक ठिकाणी ती फक्त औपचारिकता राहिली आहे. फटाक्यांचा वापर प्रचंड वाढल्याने पर्यावरण प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे काही जण आता ग्रीन दिवाळीचा अवलंब करत आहेत.

आधुनिक दिवाळी म्हणजे फॅशन, डेकोरेशन आणि ट्रेंडचा सण बनला आहे. लोक डिझायनर कपडे, महागडे दागिने, इन्स्टाग्राम फोटोशूट, दिवाळी पार्टी आणि गिफ्ट एक्सचेंज यावर अधिक लक्ष देतात. पूर्वी जिथे नात्यातील उब आणि भावना होत्या, तिथे आता दिखावा आणि स्पर्धा दिसते. जुने पारंपरिक कपडे, ओल्या मातीचे दिवे आणि नैसर्गिक रांगोळ्या आता विरळ होत चालल्या आहेत.

आजच्या काळात काही लोक पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर देत आहेत. फटाके न फोडणे, मातीचे दिवे वापरणे, सेंद्रिय रंगांच्या रांगोळ्या, कमी वीज वापरणे आणि झाडे लावणे या गोष्टींचा अवलंब केला जातो. शाळा, महाविद्यालये आणि संस्था मुलांना ‘ग्रीन दिवाळी’चा संदेश देतात. या माध्यमातून पुन्हा सणाचा खरा अर्थ “प्रकाशाचा विजय आणि अंधाराचा पराभव” याची आठवण करून दिली जाते.

दिवाळीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

दिवाळीचा मुख्य हेतू म्हणजे प्रकाशाच्या माध्यमातून अंधारावर विजय मिळवणे. तो फक्त बाह्य नव्हे तर अंतःकरणातील अंधार  म्हणजेच अहंकार, मत्सर, द्वेष, लोभ दूर करण्याचा संदेश देतो.

पारंपरिक पद्धतीत हा अध्यात्मिक विचार घट्ट रुजलेला होता. आजही जर आपण या सणाच्या मागचा विचार समजून घेतला तर दिवाळीचे खरे सार जपले जाईल.

आजच्या नव्या पिढीला सणांचा इतिहास आणि पारंपरिक महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे. घरात लहान मुलांना फराळ बनवायला लावणे, मातीचे दिवे लावणे, लक्ष्मीपूजनात सहभागी करून घेणे या छोट्या कृतींमधून संस्कृती पुढे जाते. आधुनिक तंत्रज्ञान वापरायचे, पण त्यातून आपली संस्कृती हरवू नये, हा तोल सांभाळणे आजची गरज आहे.

काळ बदलला, पद्धती बदलल्या, साधने बदलली पण दिवाळीचा आत्मा आजही तसाच आहे. तो म्हणजे प्रकाश, आनंद, एकोपा आणि प्रेमाचा विजय. पारंपरिक दिवाळीत ज्या आपुलकीचा प्रकाश होता तो आजच्या दिवाळीत पुन्हा उजळवण्याची जबाबदारी आपली आहे. जर आपण आधुनिकतेसोबत पारंपरिक संस्कार जपले, तर दिवाळी केवळ सण राहणार नाही तर ती आपल्या संस्कृतीचा, ओळखीचा आणि भारतीयतेचा जिवंत उत्सव राहील.


- वर्धा हरमल