तिसरी वनडे आज सिडनी येथे : ऑस्ट्रेलिया २-० ने आघाडीवर

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतीय संघ सध्या संकटात आहे. दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर आता व्हाईटवॉशचा (क्लीन स्वीप) धोका टीम इंडियासमोर उभा आहे. शनिवारी होणारा तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (एससीजी) होणार आहे, जो अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण हा सामना कदाचित विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा ऑस्ट्रेलियन भूमीवरील शेवटचा एकदिवसीय सामना असू शकतो.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीला अजून खातेही उघडता आलेले नाही. पहिला सामना पर्थ येथे झाला. विराटला ८ चेंडू खेळूनही एकही धाव करता आली नाही. दुसरा सामना अॅडलेड येथे झाला. तो ४ चेंडू खेळून खाते न उघडता माघारी परतला. आतापर्यंत एकूण १२ चेंडू खेळून विराटची पाटी कोरी आहे.
ही आकडेवारी भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. भारतीय संघाने मालिकेतील दोन्ही सामने गमावले असून आता तिसऱ्या सामन्यात पराभव झाला, तर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाकडून क्लीन स्वीपचा इतिहास नोंदवला जाईल.
ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्ध कधीच एकदिवसीय मालिकेत ३-० ने विजय मिळवलेला नाही. १९८४ पासून दोन्ही संघांमध्ये १५४ एकदिवसीय सामने खेळले गेले. ऑस्ट्रेलियाने ८६ सामन्यांत विजय मिळवले. तर भारताने ५८ सामन्यांत विजय मिळवले. १० सामने अनिर्णित राहिले. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील पहिला सामना ७ गड्यांनी आणि दुसरा सामना २ गड्यांनी जिंकला होता. आता त्यांच्यासमोर इतिहास घडवण्याची संधी आहे.
सिडनी हे भारतीय संघासाठी अपशकुनी ठिकाण ठरले आहे. या मैदानावर भारताने शेवटचा विजय २३ जानेवारी २०१६ मध्ये मिळवला होता. त्यानंतरचे तीनही सामने भारत हरला आहे. एकूण पाहता, ऑस्ट्रेलियाच्या भूमितील ५६ सामन्यांपैकी भारताने केवळ १४ विजय मिळवले आहेत, तर ४० सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.
सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ काही महत्त्वाचे बदल करत आहे. न्यू साउथ वेल्सचा अष्टपैलू खेळाडू जॅक एडवर्ड्सला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी एकदिवसीय आणि टी-२० संघांची घोषणा केली.
मॅथ्यू कुहनेमनला शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात घेण्यात आले आहे. मार्नस लाबुशेनला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे, जेणेकरून तो शिल्ड सामन्यात क्वीन्सलँडकडून खेळू शकेल. सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघ व्यवस्थापन जोश हेझलवुड किंवा मिचेल स्टार्कला विश्रांती देऊ शकते. ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
जोश हेझलवुड आणि शॉन अॅबॉट भारताविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यांना मुकतील. दोघेही शिल्ड सामन्यांमध्ये न्यू साउथ वेल्ससाठी खेळतील. हेझलवुड फक्त पहिले दोन टी-२० सामने खेळेल, तर अॅबॉट तिसऱ्या सामन्यानंतर संघाबाहेर जाईल. जॉश फिलिपला अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे, कारण जोश इंग्लिस दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. मनगटाच्या दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेल पहिल्या दोन टी-२० सामन्यांना मुकणार आहे; तो शेवटच्या तीन सामन्यांसाठी परतेल. बेन द्वारशियस देखील दुखापतीतून बरा होईल आणि चौथ्या व पाचव्या टी-२० सामन्यांसाठी संघात सामील होईल.
२० वर्षीय वेस्ट ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज माहली बियर्डमन शेवटच्या तीन टी-२० सामन्यांसाठी संघात समाविष्ट करण्यात आला आहे.
जॅक एडवर्ड्सची कामगिरी
जॅक एडवर्ड्सने भारतीय दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने लखनौ मध्ये ८८ धावा केल्या होत्या, कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या आणि ८९ धावा केल्या. तथापि, दोन्ही फॉरमॅटच्या मालिकेत त्याचा संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला. भारताने प्रथम श्रेणी मालिका १-० आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरने केले.
एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळतील. मालिकेचा पहिला सामना कॅनबेरा येथे दुपारी १.४५ वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल.
रोहित-कोहलीचा ‘शेवटचा’ सामना?
विराट कोहली सध्या ३६ वर्षांचा आहे आणि रोहित शर्मा ३८ वर्षांचा. दोघांनीच टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताचा पुढील दोन वर्षांत ऑस्ट्रेलियाचा दौरा नाही. त्यामुळे हे दोघे खेळाडू जर २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळले, तरी ते ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदाही खेळणार नाहीत. त्यामुळे सिडनीतील हा सामना त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे असू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा संघ : मिचेल मार्श, झेव्हियर बार्टलेट, कूपर कोनोली, बेन ड्वॉरशूईस, नॅथन एलिस, जॉश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, मिचेल ओवेन, जॉश फिलिपे, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, एडम झम्पा, अॅलेक्स केरी, जॉश इंग्लिस.
भारताचा संघ : शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
आजचा सामना
भारत वि. ऑस्ट्रेलिया
स्थळ : सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी
वेळ : सकाळी ९ वा.
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हॉटस्टार