संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय सैन्यात मानद उपाधी प्रदान
नवी दिल्ली : ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल (मानद) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या एका विशेष समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते नीरजला ही महत्त्वपूर्ण उपाधी प्रदान करण्यात आली.
क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान
नीरज चोप्राला क्रीडा क्षेत्रातील त्याचे उत्कृष्ट योगदान आणि राष्ट्राप्रती असलेल्या वचनबद्धतेसाठी हा मानद सन्मान देण्यात आला आहे. राजपत्रानुसार, ही नियुक्ती १६ एप्रिलपासून लागू झाली आहे. या समारंभासाठी नीरजची आई सरोज देवी, वडील सतीश चोप्रा, काका भीम चोप्रा आणि पत्नी हिमानी मोर हे देखील उपस्थित होते.
नीरज चोप्राची जागतिक कामगिरी
नीरज चोप्रा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भालाफेकपटू असून त्याने अनेक जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये भारताला गौरव मिळवून दिला आहे. त्याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. नीरजने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यांसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०२१ मध्ये खेलरत्न पुरस्कार आणि २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारतीय सैन्यातील नीरजचा प्रवास
२०१६ : २६ ऑगस्ट २०१६ रोजी तो नायब सुभेदार म्हणून सैन्यात दाखल झाला.
२०२१ : टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला सुभेदार म्हणून बढती मिळाली आणि सैन्याने परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले.
२०२२ : नीरजला सुभेदार मेजर म्हणून बढती देण्यात आली.
२०२४ : ४ मे रोजी भारतीय सैन्याने त्याला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान केली.