गोवा : धे धेणलो, धेणल्या पावस शेणलो...

युवकांनी​ जपली ‘धेंडलो’ परंपरा : कुंभारजुवे, तिवरे-माशेल, करमळी, वळवई, धडे सावर्डेत उत्साह

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd October, 11:45 pm
गोवा : धे धेणलो, धेणल्या पावस शेणलो...

पणजी : दीपावली पाडव्यानिमित्त राज्यभरात पारंपरिक ‘धेंडलो’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचा एक भाग म्हणून, श्रीकृष्णाची मूर्ती असलेली घुमटी (धेंडलो) गावातील प्रत्येक घरोघरी नेण्यात आली. यावेळी धेंडलो असलेल्या श्रीकृष्ण मूर्तीची पूजा करण्यात आली.
यावेळी प्रसाद म्हणून श्रीकृष्णाचे आवडते पोहे सर्वांना वाटण्यात आले. काही ठिकाणी फळे किंवा गोड गोड पदार्थ देण्यात आले. पारंपरिक धेंडलोची गाणी आणि कथाकथन श्रीकृष्णाच्या जीवनावर करण्यात आले.
दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील चौथा दिवस बलीप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा म्हणून साजरा करण्यात येतो. या उत्सवाला राज्यात ‘गोरवांचो पाडवो’ असेही म्हणतात. हा सण शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या मेहनतीचे साथीदार असलेल्या गुरांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. राज्यात सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना स्नान घालून, त्यांच्या शिंगांना रंग लावले आणि फुलांच्या माळा, झुल, घंटा लावून सजवले. महिलांनी पारंपरिक रीतीरिवाजांनुसार पूजा-अर्चा करून गुरांच्या आरत्या ओवाळून गुरांना गोडधोड खाऊ घातले.
प्रथेनुसार गावातील लोकानी आजच्या दिवशी त्यांच्या घरासमोर प्रतीकात्मक तुळशीसमोर गोठे केले होते.

असे आहे परंपरेचे स्वरूप...
- धेंडलो गावात फिरवण्याची वेगळीच प्रथा आहे. काही गावात वाड्यावाड्यांवर, तर काही ठिकाणी घरोघरी धेंडलो नाचवतात. पूर्वी धेंडलो (घुमटी) लहान असायची. एक व्यक्ती सहज माथ्यावर घेऊन घरोघरी फिरायचा. काही ठिकाणी हे स्वरूप अजूनही आहे, पण काही ठिकाणी आता धेंडलो लालखीच्या स्वरूपात सजवण्यात येतो. तो नाचवण्यासाठी अंदाजे २० ते ३० जण लागतात.
- गावात शेती करणारे कमी झाले तसेच गुरेही कमी झाली. तरीही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील कुंभारजुवे, तिवरे-माशेल, करमळी, ताळगाव, वळवई, धडे सावर्डे या गावात धेंडलो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
- काही ठिकाणी तर सकाळी सुरू झालेला हा उत्सव रात्री उशिरापर्यंत चालू होता. धडे सावर्डे येथे प्रथेनुसार सकाळी पूजा करण्यात आलेल्या गाईंच्या गळ्यातील माळा काढून धेंडलो सजवण्यात आला.

हेही वाचा