पणजी: माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंडा मतदारसंघात होणाऱ्या आगामी पोटनिवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) भाजपच्या (BJP) निर्णयाला पूर्ण पाठिंबा देणार असल्याची घोषणा वीजमंत्री तथा मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. पर्वरी मंत्रालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना ढवळीकर यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.
रवी नाईक यांच्या पुत्राला पाठिंबा
रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. या मागणीला मगो पक्षानेही पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, डॉ. केतन भाटीकर यांच्याबद्दल बोलताना ढवळीकर यांनी स्पष्ट केले की, जो कोणी मगो पक्षात आहे, त्याला पक्षाचा निर्णय मान्य करावाच लागेल. मगोची भाजपबरोबर युती असल्याने फोंडा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा असेल.
विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह
ढवळीकर यांनी यावेळी विरोधी पक्षांच्या संभाव्य एकजुटीवरही प्रश्नचिन्ह उभे केले. नुकतेच दिवाळीपूर्वी फातोर्डातील एका कार्यक्रमात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी (RG) या पक्षाचे नेते एकत्र दिसले होते, ज्यामुळे विरोधकांच्या ऐक्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. यावर बोलताना ढवळीकर म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांनी यापूर्वी अनेक पक्ष बदललेले आहेत. अशा स्थितीत ते कदापि एकत्र येऊ शकत नाहीत. विरोधक एकसंध राहणे अशक्य आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.