वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी होणार मोठे बदल; वाहतुकीचा ताण कमी करण्यावर भर
पणजी : पर्वरी-म्हापसा मार्गावरील एलिवेटेड कॉरिडॉरच्या (Elevated Corridor) कामामुळे वाहतुकीत होणारे संभाव्य बदल केवळ स्पष्ट आणि योग्य पर्यायी मार्गांची (Alternative Routes) व्यवस्था केल्यानंतरच केले जातील, असे आश्वासन पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी दिले आहे.
पर्यटन हंगाम सुरू असल्याने आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येण्याची शक्यता असल्याने, स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांसह कामाचा आढावा
या पार्श्वभूमीवर, रोहन खंवटे यांनी आज सकाळी बुधवार, २२ ऑक्टोबर रोजी उपसभापती तथा म्हापसा आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), वाहतूक कक्ष (Traffic Cell), जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. संबंधित खात्यांमध्ये समन्वय ( Co ordination) असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील आणि प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल, असे खंवटे यांनी सांगितले.
वाहतुकीचा ताण आणि धूळ प्रदूषणावर चिंता
रोहन खंवटे यांनी पर्वरीतील महिंद्रा शोरूमसमोर सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव तसेच पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.
सध्या या कॉरिडॉरच्या कामामुळे म्हापसा ते पणजी या मार्गावर प्रवासाला एका तासाहून अधिक वेळ लागत आहे, ज्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. वाढलेली वाहतूक कोंडी आणि धूळ प्रदूषणामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन, खंवटे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.
पर्यटनावर परिणाम होऊ नये, तसेच स्थानिक लोकांनाही त्रास होऊ नये यासाठी विशिष्ट नियम पाळले पाहिजेत. वाहतुकीचा वेळ कसा कमी करता येईल, यावर विचार करून वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्याचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन खंवटे यांनी दिले.