गोव्याचे पर्यटक मालवणला नेणाऱ्या दलालांना 'उपद्रवी' घोषित करून कारवाई करणार

पर्यटन खात्याचा कडक पवित्रा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्याचे पर्यटक मालवणला नेणाऱ्या दलालांना 'उपद्रवी' घोषित करून कारवाई करणार

पणजी: गोव्यातील जलक्रीडा (Water Sports) क्षेत्राला शिस्त लावण्यासाठी आणि स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. गोव्यातील पर्यटकांना मालवण आणि इतर राज्यांमध्ये जलक्रीडेसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सी आणि दलालांना (टाउट्स) 'उपद्रवी' (Nuisance) म्हणून घोषित करून त्यांच्यावर गोवा पर्यटन उद्योग कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.

पर्यटन भवन येथे वॉटर स्पोर्ट्सचे मालक आणि किनारपट्टीवरील आमदारांची बैठक घेतल्यानंतर रोहन खंवटे यांनी ही माहिती दिली. बैठकीला कळंगुटचे आमदार मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, साळगावचे आमदार केदार नाईक, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि पर्यटन संचालक उपस्थित होते.

जलक्रीडा दरात एकसमानता लागू

दोन वर्षांपासून रखडलेला जलक्रीडा दरातील एकसमानतेचा विषय आता मार्गी लागला आहे. वॉटर स्पोर्ट्ससाठी संपूर्ण राज्यात एकसमान दर (Uniform Rates) लागू करण्यात आले असून, तशी अधिसूचना राजपत्रात (Gazette) जारी करण्यात आली आहे. हे दर वॉटर स्पोर्ट्स मालकांनीच ठरवले असून, आता या दरांचे फलक (Rate Charts) तयार करण्याचे काम सुरू आहे.

बेकायदेशीर एजन्सी आणि दलालांवर कारवाई

पर्यटन विभागाने बेकायदेशीररीत्या तिकीट विक्री करणाऱ्या एजन्सींना इशारा दिला आहे. ज्या ट्रॅव्हल एजन्सी, ऑनलाइन किंवा कार्यालयांमधून कोणतीही परवानगी नसताना जलक्रीडेची तिकिटे विकत आहेत, त्यांच्यावर स्थानिक पंचायती आणि वॉटर स्पोर्ट्स संघटनेच्या मदतीने कारवाई सुरू केली जाईल.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रस्थित काही एजन्सी आणि दलाल गोव्यात तिकिटे विकून पर्यटकांना मालवण किंवा इतर राज्यांमध्ये घेऊन जात आहेत. यावर अंकुश लावण्यासाठी विधानसभेत मंजूर झालेल्या कायद्यानुसार, भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली अशा एजन्सी आणि दलालांना  'उपद्रवी' घोषित करून कठोर कारवाई केली जाईल.

स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन

पर्यटनमंत्री खंवटे यांनी गोव्यातील जलक्रीडा व्यवसाय हा केवळ गोमंतकीयांचाच राहील, असा स्पष्ट संदेश दिला आहे. तसेच, योग्य ऑनलाइन लिंक्स असलेल्या गोव्यातील एजन्सींना पर्यटन विभाग प्रोत्साहन देईल.

याशिवाय, वॉटर स्पोर्ट्सच्या काउंटर्सना कलर कोडिंग करण्याची सूचना देण्यात आली आहे, जेणेकरून उत्तर किंवा दक्षिण गोव्यात कुठेही असले तरी ते पर्यटकांना लगेच ओळखता येतील. पर्यटकांना कोणतीही समस्या आल्यास १३६४ या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा