वाहतूक खात्यासह पीडब्ल्यूडी करणार वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा
पणजी : पर्वरी-म्हापसा मार्गावर जिथे रस्ता अरुंद आहे, तेथे रात्रीच्या वेळीच एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम करून दिवसा वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रस्ताव आहे. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी यावर विचार सुरू आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम खाते वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा तयार करेल. या आराखड्यावर बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिली. एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामामुळे सध्या पणजी - म्हापसा मार्गावरील वाहतुकीला बराच वेळ लागत आहे.
वाहतूक वळवण्यात येणाऱ्या स्थानिक अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल. ज्या ठिकाणी वाहतूक वळवणे शक्य नाही, त्या ठिकाणी मुख्य मार्गावरील वाहतूक सुरू राहील. पर्वरी-म्हापसा मार्गावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या (फ्लायओव्हर) पुढील टप्प्यातील कामासाठी काही ठिकाणी आता वाहतुकीत मोठे बदल करावे लागतील.
मंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी सकाळी अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी केली. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा उपस्थित होते. त्यांनी पर्वरी महिंद्रा शोरूमसमोर सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव आणि पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामामुळे म्हापसा-पणजी मार्गावरील प्रवासाला सध्या एका तासाहून अधिक वेळ लागतो. हा वेळ कसा कमी करता येईल, यावर विचार करून त्यानुसार वाहतूक व्यवस्थेत बदल केले जातील.
एकपदरी मार्गामुळे अडथळा...
सध्या काही ठिकाणी एकपदरी मार्ग केल्यामुळे वाहतूक ठप्प होते. ते तीनपदरी करून त्या रस्त्याचे डांबरीकरण केल्यास वाहतूक सुरळीत होईल, असे काही प्रवाशांनी सांगितले. तसेच महत्त्वाचे काम सुट्टीच्या दिवशी आणि रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत करावे, अशी मागणीही त्यांनी केली.