गोव्यातील कारखान्यांनी एका वर्षात विजेसाठी खर्च केले १,३३९ कोटी रुपये

विजेसह कोळसा, पेट्रोलियम पदार्थ, विविध प्रकारच्या इंधनांचा वापर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd October, 11:50 pm
गोव्यातील कारखान्यांनी एका वर्षात विजेसाठी खर्च केले १,३३९ कोटी रुपये

पणजी : राज्यातील विविध कारखान्यांनी एका वर्षात इंधनावर १९९० कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये कारखान्यांनी विजेसह कोळसा, पेट्रोलियम पदार्थ व विविध प्रकारच्या इंधनांचा वापर केला आहे. यातील सर्वाधिक १३३९ कोटी रुपये केवळ विजेसाठी खर्च करण्यात आले आहेत. केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्याने जारी केलेल्या कारखान्यांच्या वार्षिक सर्वेक्षण अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यातील कारखान्यांनी इंधन म्हणून सुमारे १५६ कोटी किलोवॉट विजेचा वापर केला. यानंतर पेट्रोलियम पदार्थांसाठी १५५ कोटी रुपये, ५८ हजार टन कोळशासाठी ८२ कोटी रुपये, तर अन्य प्रकारच्या इंधनासाठी ६१२ कोटी रुपये खर्च केला.
मागील काही वर्षांत इंधनावर केल्या जाणाऱ्या खर्चात वाढ होत आहे. २०२०-२१ मध्ये राज्यातील कारखान्यांनी इंधनासाठी एकूण १४२० कोटी रुपये खर्च केले होते.
राज्यात २०२०-२१ मध्ये कारखान्यांकडून सुमारे १४८ हजार किलोवॉट विजेचा वापर झाला. ही वीज विकत घेण्यासाठी सुमारे ९९४ कोटी रुपये खर्च झाला, तर पेट्रोलियम पदार्थांसाठी २४७ कोटी रुपये, कोळशासाठी ५२ कोटी रुपये व अन्य प्रकारच्या इंधनासाठी ५२६ कोटी रुपये खर्च केला. वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कारखान्यांनी इंधनावर एकूण १८२१ कोटी रुपये खर्च केले होते.
यात विजेसाठी ८८१ कोटी कोटी, पेट्रोलियम पदार्थांसाठी २०१ कोटी रुपये व अन्य प्रकारच्या इंधनासाठी २८२ कोटी रुपये खर्च झाला होता.

कोळसा वापरात घट

राज्यातील कारखान्यात इंधन म्हणून कोळसा वापरण्यात घट झाली आहे. २०२०-२१ मध्ये राज्यातील कारखान्यांनी ८८ हजार टन कोळसा वापरला होता, तर २०२३-२४ मध्ये ५८ हजार टन कोळसा वापरण्यात आला.                                 

हेही वाचा