एफसी गोवाचा अल नासरकडून १-२ ने पराभव

एएफसी चॅम्पियन्स लीग टू : अँजेलो, कॅमाराचे निर्णायक गोल

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
एफसी गोवाचा अल नासरकडून १-२ ने पराभव

फातोर्डा : एफसी गोवाला एएफसी चॅम्पियन्स लीग टू स्पर्धेच्या तिसऱ्या गट टप्प्यातील सामन्यात सौदी अरेबियातील बलाढ्य अल नासर संघाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. फातोर्डा, मडगाव येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात, सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या सहभागाबद्दल प्रचंड उत्सुकता होती.
बलाढ्य पाहुण्या संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले. अल नासरसाठी २० वर्षीय अँजेलो गॅब्रिएलने १० वे मिनिटाला बॉक्सबाहेरून दमदार उजव्या पायाचा फटका मारत गोल केला आणि संघाला लवकर आघाडी मिळवून दिली. गॅब्रिएलचा स्पर्धेतील हा दुसरा गोल होता. २७ व्या मिनिटाला हारून कॅमाराने डावीकडून आलेल्या अचूक क्रॉसवर गोल करत अल नासरची आघाडी २-० अशी भक्कम केली. या काळात अल नासरने बॉल पोझिशनवर अधिक नियंत्रण ठेवले होते.
सामन्याच्या मध्यांतरापूर्वी एफसी गोवाने जोरदार प्रत्युत्तर दिले. ४१ व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या ब्रिसन फर्नांडिसने बॉर्जा फर्नांडिसकडून मिळालेल्या पासवर आपल्या मार्करला चकवले आणि उजव्या पायाने गोल करत एफसी गोवासाठी गोलसंख्या २-१ अशी केली.
दरम्यान, एफसी गोवाचा प्रवास आतापर्यंत कठीण ठरला आहे. या पराभवानंतर एफसी गोवा गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. त्यांनी अल झोवरा एससी आणि इस्तिकलोल विरुद्धही ०-२ असा पराभव स्वीकारला होता.
टिमोरला रेड कार्ड
सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात एफसी गोवाला मोठा धक्का बसला. एका टॅकलमुळे डेव्हिड टिमोरला थेट रेड कार्ड दाखवण्यात आले, ज्यामुळे एफसी गोवाला उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळावा लागला.
अल नासरचा सलग तिसरा विजय
अल नासरने स्पर्धेतील आपला अपराजित विक्रम कायम राखला आहे. सलग तिसरा विजय मिळवत ते ८ गुणांसह गट डी मध्ये अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी यापूर्वी एफसी इस्तिकलोलवर ५-० आणि अल झोवरा एससीवर २-० ने विजय मिळवला होता.