भारताने दुसऱ्या वनडेसह गमावली मालिका

ऑस्ट्रेलियाचा २ गडी राखून विजय : अॅडम झाम्पाचे ४ बळी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
भारताने दुसऱ्या वनडेसह गमावली मालिका

अ‍ॅडलेड: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचा दुसरा वनडे भारतासाठी निराशेचा ठरला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग दुसरा सामना गमावला आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळाली. हा सामना भारतीय संघासाठी ‘करो किंवा मरो’ सारखा होता, मात्र परंतु, अखेर भारतीय गोलंदाजांना आवश्यक ती पकड साधता आली नाही आणि भारतीय फलंदाजांकडून अपेक्षित योगदानही पूर्ण झाले नाही.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २६४ धावा केल्या, या धावसंख्येमध्ये रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांचा उल्लेखनीय वाटा होता. सुरुवातीला शुभमन गिल केवळ ९ धावा करून लवकरच माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघाच्या सुरुवातीला मोठा फटका बसला. गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली देखील आपले विस्फोटक फलंदाजीचे स्वरूप दाखवू शकला नाही आणि तो सलग दुसऱ्यांदा आपले खाते न उघडताच माघारी परतला. त्यामुळे संघावर दबाव वाढला.
रोहित शर्माने संयमित सुरुवात करून फलंदाजीत स्थिरता आणली. सेट झाल्यानंतर त्याने दमदार फटकेबाजी सुरू केली. रोहितने ७३ धावांची खेळी केली, त्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याने संयमाने फलंदाजी करत मोठे फटके खेळले आणि ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहितने या सामन्यात ६ धावा काढताच हा ऐतिहासिक टप्पा गाठला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (८०२ धावा), तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (७४० धावा), चौथ्या क्रमांकावर एमएस धोनी (६८४ धावा) आणि पाचव्या क्रमांकावर शिखर धवन (५१७ धावा) यांचा समावेश आहे. रोहितला श्रेयस अय्यरची साथ मिळाली आणि दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी भारतीय संघासाठी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी महत्त्वाची ठरली.
श्रेयस अय्यरनेही ६१ धावा करून संघाला पुढे नेले. परंतु त्यानंतर केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांना मोठी कामगिरी करता आली नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाची स्थिती ढासळू लागली. मात्र अक्षर पटेलने ४४ धावांची कामगिरी करून भारताला २०० धावांच्या पलीकडे पोहोचवले. अखेर हर्षित राणाने २४ धावा आणि अर्शदीप सिंगने १३ धावा करत भारतीय संघाने २६४ धावांचा टप्पा पूर्ण केला.
ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने ६० धावांत ४, झेवियर बार्टलेटने ३९ धावांत ३ तर मिचेल स्टार्कने ६२ धावांत २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात धिमी झाली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धावा करण्याची जास्त संधी दिली नाही. त्यामुळे कर्णधार मिचेल मार्श ११ तर ट्रॅविस हेड २८ धावांवर बाद झाले. मात्र त्यानंतर आलेल्या मॅथ्यू शॉर्टने ७८ चेंडूत ७४ धावा करून भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले. कूपर कॉनोलीने ५३ चेंडूत नाबाद ६१ करून संघाला विजयापर्यंत नेले. मिचेल ओवेनने २३ चेंडूत ३६ धावा, मॅट रेनशॉने ३० चेंडूत ३० धावांचे योगदान दिले. भारतातर्फे हर्षित राणा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने हा सामना २२ चेंडू आणि २ गडी राखून जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारताने ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत एवढी वाईट कामगिरी यापूर्वी केली नव्हती. यापूर्वी भारतीय संघ वनडे मालिका ऑस्ट्रेलियात खेळली खरी, पण एवढी नामुष्की भारतावर कधीच आली नव्हती. भारताला हे मैदान लकी होते. कारण या मैदानात भारताने गेल्या १७ वर्षांत पाच वनडे सामने खेळले होते. या पाच सामन्यांमध्ये भारताने चार विजय मिळवले होते, तर त्यांना एका सामन्याच बरोबरी पत्करावी लागली होती. पण शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताला या अ‍ॅडलेडच्या मैदानात १७ वर्षांत पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे भारतासाठी ही सर्वात नामुष्कीची वेळ आहे. कारण गेल्या १७ वर्षांंच्या मोठ्या कालावधीनंतर भारताला हा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे.
रोहितने गिलख्रिस्ट, गांगुलीला टाकले मागे
रोहितने ७३ धावांची खणखणीत खेळी करताना ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. या खेळीदरम्यान त्याने वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सौरव गांगुली आणि अॅडम गिलख्रिस्ट यांना मागे टाकले. पहिली धाव घेताच रोहितने गांगुलीला (९,१४६ धावा) मागे टाकले, तर ५४ धावांवर पोहोचताना गिलक्रिस्टच्या ९,२०० धावांचा विक्रम मोडला. आता रोहित ९,२१९ धावांसह सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे आता फक्त सचिन तेंडुलकर (१५,३१०), सनथ जयसूर्या (१२,७४०) आणि ख्रिस गेल (१०,१७९) आहेत.
वनडेत सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर
सचिन तेंडुलकर – १५,३१०
सनथ जयसूर्या – १२,७४०
ख्रिस गेल – १०,१७९
रोहित शर्मा – ९,२१९
अ‍ॅडम गिलख्रिस्ट- ९,२००

सौरव गांगुली – ९,१४६

ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय:
रोहित शर्मा – १०००* धावा
विराट कोहली – ८०२ धावा
सचिन तेंडुलकर – ७४० धावा
एमएस धोनी – ६८४ धावा
शिखर धवन – ५१७ धावा
रोहित सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज
रोहित शर्मा ९७ चेंडूत ७३ धावा काढून बाद झाला. मिशेल स्टार्कच्या फाइन लेगवर तो जोश हेझलवूडने झेलबाद झाला. ७३ धावांच्या त्याच्या खेळीसह, रोहित एकदिवसीय सामन्यात भारताचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. रोहितने गांगुलीला मागे टाकले, ज्याने ३०८ सामन्यांमध्ये ११,२२१ धावा केल्या होत्या. रोहितच्या आता ११,२४९ धावा आहेत. सचिन तेंडुलकर पहिल्या आणि विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
१७ व्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक गमावली
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल नाणेफेक जिंकण्यात अपयशी ठरला. भारताने सलग १७ व्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावली आहे. संघाने शेवटची नाणेफेक १५ नोव्हेंबर २०२३ रोजी न्यूझीलंडविरुद्ध जिंकली होती. तेव्हापासून, रोहित शर्माने १५ वेळा नाणेफेक गमावली आहे आणि शुभमन गिलने दोनदा गमावली आहे.