पाच लाख रुपयांचे नुकसान : भरपाईसाठी अर्जांवर कृषी खात्याकडून प्रक्रिया सुरू
पणजी : पेडणे तालुक्यात ओमकार हत्तीने (Omkar Elephant) केलेल्या नासधुशीत ३१ शेतकऱ्यांचे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. यात बहुतेक बागायती पिकांचा समावेश आहे. शेतकरी आधार निधी योजनेद्वारे शेतकरी-बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.
तांबोसे आणि उगवे गावात हत्तीने नुकसान केले. या नुकसानीचे आम्ही विश्लेषण केले असून हत्तीने आंबा, माड, सुपारी आणि केळींचे नुकसान केल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे भातपीक नष्ट झाले आहे. या सर्व ३१ शेतकऱ्यांना एकूण ५ लाख रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई शेतकरी आधार निधी अंतर्गत मिळेल. त्यांचे अर्ज प्रक्रिया करण्यासाठी सांख्यिकी विभागाकडे पाठवण्यात आले आहेत, असे फळदेसाई यांनी सांगितले.
भातशेतीसाठी प्रति हेक्टर ४०,००० रुपये, तर ते फळबागांसाठी नुकसानीची रक्कम झाडाच्या वयानुसार निश्चित केली जाते, असे फळदेसाई म्हणाले.
दोन दिवसांत दिली कृषी कार्डे
विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी या दोन गावांत सर्वेक्षण केले आहे. सुमारे १० शेतकऱ्यांनी अद्याप भरपाईसाठी अर्ज केलेला नाही. काही शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड नव्हते. या योजनेसाठी कृषी कार्ड अनिवार्य आहे. ते नसल्यामुळे काही शेतकरी अर्ज करू शकत नाहीत. परंतु त्यांना कृषी अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत कृषी कार्ड करून दिले. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला नाही, त्यांना अर्ज करण्यास सांगण्याचे निर्देश स्थानिक पंचायतींना देण्यात आले आहेत, असे फळदेसाई म्हणाले.