लाखरे-डिचोलीतील ९ वर्षांच्या प्रणव ताटेचे असामान्य धैर्य; घराची राख होण्यापासून वाचवले.
डिचोली: गोव्यातील डिचोली येथील लाखेरे भागात आज गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी एका नऊ वर्षांच्या चिमुकल्याने दाखवलेल्या असामान्य धैर्यामुळे त्याच्या कुटुंबावर आलेले मोठे संकट टळले आहे.
प्रणव ताटे (Pranav Tate) असे या धाडसी मुलाचे नाव आहे. घरातली सर्व मंडळी कामासाठी बाहेर गेली असताना, प्रणव घराशेजारी मित्रांसोबत खेळत होता. खेळून झाल्यावर तो चहा पिण्यासाठी घरी परतला, तेव्हा त्याला घराच्या कौलांमधून धूर येत असल्याचे दिसले. त्याने त्वरित घरात जाऊन पाहिले असता, फ्रीजला आग लागल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
इतर कोणतीही व्यक्ती गोंधळून गेली असती, पण चिमुकल्या प्रणवने जराही न घाबरता मोठे प्रसंगावधान राखले. त्याने तात्काळ घराबाहेर असलेल्या नळाचे पाणी हाताला मिळेल त्या भांड्यांमध्ये जमा केले आणि ते पाणी आत नेत जळत असलेल्या फ्रीजवर पाण्याचा मारा केला. त्याच्या या 'फायर फायटर' वृत्तीमुळे ही आग वेळेत नियंत्रणात आणता आली आणि मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज शेजाऱ्यांनी व्यक्त केला.
एका नऊ वर्षांच्या मुलाने दाखवलेले हे धैर्य वाखाणण्याजोगे आहे. प्रणवच्या या प्रसंगावधानाची आणि त्याने उचललेल्या त्वरित पावलांची चर्चा बिचोली तालुक्यात मोठ्या कौतुकाने होत आहे. दरम्यान, ताटे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने, डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. प्रणवच्या या धाडसामुळे परिसरातील नागरिकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.