बांबोळी येथे अपघातात ठार; दोघेही युवक मूळ केरळचे
पणजी : आगशी पोलीस स्थानक हद्दीत बांबोळी येथे दोन दिवसांमागे झालेल्या अपघातात (accident) दोन अग्निवीर (Agniveer) नौदल कॅडेट (Navy Cadet) युवक ठार झाले. बुलेटची (Bullet) धडक दुभाजकाला बसून हा अपघात घडला. दोघेही युवक अग्निवीर असून, गोव्यातील आयएनएस हंसाशी (INS HANSA) निगडीत होते. अपघातात ठार झालेल्या युवकांची हरिगोविंद पी. (२२ वर्षे, कोलम, केरळा) तर विष्णु जयप्रकाश (२१ वर्षे, कन्नुर, केरळा) (Kerala) अशी आहेत.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांबोळी येथे सैनिक आरामगृहाच्या विरुद्ध बाजूला २१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० वाजता हा अपघात घडला. अपघातानंतर दोघाही युवकांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना मृतावस्थेत आणल्याचे डॉक्टांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नौदल अधिकारी गोमेकॉत पोचले. कुटुंबियांनी ही गोव्यात धाव घेतली. नौदलाच्या कोची येथील मुख्यालयातून या दोघाही युवकांना विशेष ‘डयुटी’साठी गोव्यात पाठवले होते.
वास्को येथे आयएनएस हंसा तळावर शेवटचा निरोपाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दोघांचेही मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आल्याची माहिती आगशी पोलीस स्थानकातील अधिकृत सूत्रांनी दिली.