
मडगाव : गोव्यातील दवर्ली-दिकरपाल पंचायतीच्या राजकारणात गुरुवारी मोठा भूकंप झाला. सकाळी सरपंचपदी मिनिनो कुलासो यांची ७ विरुद्ध ४ अशा फरकाने निवड झाली. मात्र, या निवडीनंतर लगेच दुपारी सहा पंचांनी एकत्र येत नव्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. त्यामुळे या पंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठी राजकीय रंगत आली आहे.
भाजपच्या गटाला धक्का, कुलासो यांची निवडदवर्ली-दिकरपाल सरपंच व उपसरपंच पदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मिनिनो कुलासो यांनी ७-४ अशा मत फरकाने विद्याधर आर्लेकर यांचा पराभव करत सरपंचपद मिळवले. आर्लेकर हे आमदार उल्हास तुयेकर यांच्या मर्जीतील पंच असल्याने, त्यांचा हा पराभव आमदार तुयेकर यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात होता. उपसरपंच पदासाठी संपदा नाईक यांचा एकच अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणुका रद्द झाल्यानंतर पुन्हा प्रक्रियासरपंच साईश राजाध्यक्ष व उपसरंपच विद्याधर आर्लेकर यांनी राजीनामा दिल्यापासून ही दोन्ही पदे रिक्त होती. यापूर्वी निवडणुका घेण्यात आल्या असता, मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे दुखवटा पाळण्यात येत असल्याने बीडीओ आदर्श देसाई यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुका रद्द केल्या होत्या. त्यानंतर पंचांनी विरोध दर्शवल्यानंतर गुरुवारी पुन्हा निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
अखेर सहा पंचांनी दाखल केला अविश्वास ठरावकुलासो यांच्या निवडीनंतर राजकीय हालचाली पुन्हा सुरू झाल्या. साईश राजाध्यक्ष, विद्याधर आर्लेकर, हरकुलानो कुलासो, संपदा नाईक, विधी वरक, आणि संतोष नाईक या सहा पंचांनी एकत्र येत नव्या सरपंचाकडे बहुमत नाही, असे नमूद केले आणि विशेष बैठक घेण्यात यावी यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना कळवले. या सर्व प्रकारामुळे पुन्हा पंचायतीवर भाजपची सत्ता येईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे.