हल्लीच त्यांची तडकाफडकी उत्तर गोवा पोलीस राखीव विभागात बदली करण्यात आली होती.
म्हापसा : पोलीस निरीक्षक (Police Inspector) विजय राणे सरदेसाई (Vijai Rane Sardesai) यांची पुन्हा डिचोली पोलीस (Bicholim Police Station) स्थानकात बदली (Transfer) करण्यात आली आहे. हल्लीच त्यांची तडकाफडकी उत्तर गोवा पोलीस राखीव विभागात बदली करण्यात आली होती. वरीष्ठांकडे आपली बाजू मांडल्यावर पुन्हा त्यांना डिचोली पोलीस स्थानकात पाठवण्यात आले. पोलीस कर्मचार्यांनी केलेल्या तोंडी तक्रारीनंतर पोलीस खात्याने निरीक्षक राणे यांच्यावर कारवाई केली होती. तसेच वाळपईचे पोलीस निरीक्षक विध्देश शिरोडकर यांच्याकडे डिचोली पोलीस स्थानकाचा अतिरीक्त पदभार देण्यात आला होता.
यासंदर्भातील बिनतारी आदेश उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी जारी केला होता. उत्तर गोवा राखीव विभागात हजेरी लावण्याचे निर्देश निरीक्षक राणे यांना दिले होते.
दरम्यान, निरीक्षक राणे यांच्या विरोधात कर्मचार्यांनी केलेल्या तक्रारींची गृहखात्याकडून गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश वरीष्ठ पोलीस अधिकार्यांना खात्यातर्फे देण्यात आले होते. मात्र, गुरुवारी दुपारी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर निरीक्षक राणे सरदेसाई यांनी डिचोली पोलीस स्थानकाचा पुन्हा रितसर ताबा घेतला.