रेल्वेने गावी परतताना, अवघ्या ३० वर्षांच्या तरुणाचा मडगाव स्टेशनवर अपघाती मृत्यू

नोकरी न मिळाल्याने होता निराश. गडबडीत रेल्वेत चढताना पडल्याने गमावला जीव

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
रेल्वेने गावी परतताना, अवघ्या ३० वर्षांच्या तरुणाचा मडगाव स्टेशनवर अपघाती मृत्यू

मडगाव: गोव्यात काम शोधण्यासाठी आलेल्या ओडिशा येथील अविनाश रॉय (वय ३०) याची निराशा झाली आणि परत गावी जाण्यासाठी रेल्वेत चढत असताना पाय घसरून तो रेल्वेखाली पडला. जखमी रॉय याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा येथील अविनाश रॉय हा युवक कामाच्या शोधात आपल्या मामेभावासोबत गोव्यात आला होता. बुधवारी गोव्यात आल्यानंतर ज्या व्यक्तीने काम देण्याचे कबूल केले होते, तिचा मोबाईल लागत नव्हता. सदर इसमाचा फोन न लागल्याने निराश झालेल्या रॉय आणि त्याच्या मामेभावाने परत गावी जाण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी मडगाव रेल्वे स्टेशनवर ते आले असता, शालिमार एक्स्प्रेस ही अमरावतीला जाणारी रेल्वे उभी होती. त्यांनी स्थानकावर चौकशी केली असता, सदर गाडी झारखंडला जाणार असल्याचे त्यांना कोणीतरी सांगितले. त्यामुळे घाईगडबडीत ते दोघेही गाडीत चढले. याचवेळी अविनाश रॉय याचा पाय घसरून तो चालत्या गाडीखाली पडला. गाडी दोन्ही पायांवरून गेल्याने अविनाश याला गंभीर दुखापत झाली होती.

त्याला तत्काळ दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केलेली आहे. पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा