युवकांना शेती करण्याचे आवाहन
माशेल : आजच्या रेडीमेडच्या जमान्यात सर्वकाही बाजारात विकत मिळते. त्यामुळे गोव्यातील बऱ्याच पारंपारिक व्यवसायांना अखेरची घरघर लागली आहे. तरीही आज ही राज्यात काहीजण आपले वडिलोपार्जित
पारंपारिक व्यवसाय सांभाळून आहेत. तिवरे, माशेल (marcel) येथील जयेश नाईक (Jayesh Naik) यांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेला गावठी पोहे (फोव) (flattened rice) बनवण्याचा व्यवसाय आजही सुरू ठेवला आहे. कुटुंबीय, शेजारी, नातेवाईक यांची मदत घेऊन ते हा पारंपारिक व्यवसाय करीत आहेत. अनेक अडचणी असल्या तरी त्यावर मात करून व्यवसाय चालू ठेवला आहे. आजच्या युवकांनी आपली घरची शेती करून भात पिकवावे असे आवाहन ही केले.
जयेश नाईक यांनी सांगितले की, पारंपारिक (Traditional) पद्धतीने गावठी पोहे बनवण्याचा व्यवसाय आपल्या वडिलांनी ३४ वर्षांमागे सुरू केला होता. वडिलांनी व्यवसाय सुरू करून मार्ग दाखवला तो का बंद करावा, म्हणून आपण आजही चालू ठेवला आहे. दिवाळीच्या दिवसांतच गावठी पोहे करतो. आपण शेती करीत नसलो तरी, गावठी पोहे तयार करण्यासाठी सर्वप्रथम भात विकत घेऊन आणतो. काही वेळा भात मिळणे कठीण बनते. यावर्षी पाऊस पडल्याने, शेती पिकूनही कापण्यास अडचणी आल्या. त्यामुळे वेळेत भात मिळणे कठीण झाले. पोहे तयार करण्यात आपले कुटुंब, शेजारी, मित्र, नातेवाईकही मदत करीत असतात. भात आणल्यानंतर प्रथम पाण्याच्या टाकीत घालून ८ ते १२ तास फुगवून घेतले जाते. त्यानंतर सुखण्यासाठी ठेवले जाते व नंतर पोहे तयार करण्यासाठी टाकले जातात. पारंपारिक पद्धतीने पोहे तयार करण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. हाताला चटके सहन करावे लागतात. पूर्वी आपण बेळगावहून कामासाठी माणसे आणत होतो. मात्र, आता औद्योगिकीकरणामुळे माणसे मिळणे कठीण होते. तरीही काही वयस्क मंडळी येत असतात. मागणीप्रमाणे पोहे तयार करून विकतो व परिसरात आपण स्वत: व कुटुंबिय पोह्यांची विक्री करतात. बाजारात मिळत असलेले पोहे स्वस्त तर गावठी पोहे करण्यास लागणारे कष्ट, स्वाद लक्षात घेऊन किंमत थोडी जास्त असते. मात्र, काहीजण किंमतीवरून घासाघिस करतात. बाजारी असो किंवा गावठी; कुठलेही पोहे खाल्ले तरी सारखेच असेही म्हणत असतात. तरीही आपण नाऊमेद न होता हा पारंपारिक व्यवसाय सुरूच ठेवला आहे. केवळ दिवाळीच्या दिवसांतच आपण गावठी पोहे करतो. एरवी भाताचे तांदुळ ही करून देतो. आजच्या युवकांनी आपल्या घरी शेती असल्यास नक्कीच करावी असा संदेश जयेश देतो. कारण आपण कष्टाने पिकवलेले तांदुळ हे जास्त रुचकर, आरोग्यवर्धक असतात असे त्यांचे म्हणणे आहे.