'आरजीपीने दिल्लीतील बिल्डरकडून पैसे घेतले हे सिद्ध करा; पक्षच बंद करू'

मनोज परबांचे मायकल लोबोंना थेट आव्हान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
'आरजीपीने दिल्लीतील बिल्डरकडून पैसे घेतले हे सिद्ध करा; पक्षच बंद करू'

पणजी: 'रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष' (RGP) चे प्रमुख मनोज परब यांनी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना थेट आव्हान दिले आहे. 'आरजीपीने दिल्लीतील बिल्डर लॉबीकडून पैसे घेऊन कोणतीही तक्रार मागे घेतल्याची एक तरी 'सेटिंग' मायकल लोबो यांनी सिद्ध करून दाखवावी. जर लोबो यांनी हे सिद्ध केले, तर आम्ही आमचा पक्ष बंद करायला तयार आहोत,' असे परब यांनी स्पष्ट केले आहे.

पणजी येथील आरजीपीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनोज परब यांनी मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नी डिलायला लोबो यांच्यावर जोरदार टीका केली.

आरोपांना प्रत्युत्तर

लोबो यांचे पुत्र डॅनियल लोबो यांनी हणजूण समुद्रकिनाऱ्याजवळ सुरू केलेल्या संरक्षक भिंतीच्या बांधकामावर मनोज परब यांनी आवाज उठवल्यानंतर, मायकल लोबो यांनी परब यांच्यावर आरोप केला होता. लोबो यांच्या मते, परब हे केवळ गोमंतकीय लोकांना लक्ष्य करतात, पण दिल्लीतील बिल्डर बांधकाम करतात तेव्हा त्यांच्याकडून पैसे घेऊन 'सेटिंग' करतात. याव्यतिरिक्त, डिलायला लोबो यांनी मालमत्तेत घुसखोरीची तक्रार दिल्यानंतर हणजूण पोलिसांनी आरजीपीच्या कार्यकर्त्यांवर 'एफआयआर' (FIR) दाखल केला होता.

'लोबो यांनी चार प्रकल्प बंद करून दाखवावे'

या आरोपांना उत्तर देताना मनोज परब म्हणाले की, शिवोले मतदारसंघातील सर्व पंचायती मायकल लोबो यांच्या ताब्यात आहेत. आरजीपीने या सगळ्या पंचायतींमध्ये मेगा प्रकल्पांविरुद्ध अनेक तक्रारी नोंदवलेल्या आहेत. परब यांनी लोबो यांना आव्हान दिले की, "जर मायकल लोबोंमध्ये क्षमता असेल, तर त्यांनी किमान चार प्रकल्प बंद करून दाखवावे.".

'जमीन दिल्लीकरांना विकण्याचा डाव'

परब यांनी लोबो यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले की, मायकल लोबो कलिंगडाची शेती करण्याबद्दल बोलतात. आता त्यांनी हणजूण येथील मालमत्तेत आंबे, काजू किंवा फणसाची झाडे लावावीत. मात्र, हे न करता त्यांचा मुलगा डॅनियल लोबो याने डोंगराच्या जमिनीच्या रूपांतरणासाठी अर्ज केला आहे. "मायकल लोबो यांनी ही मालमत्ता विकसित करून दिल्लीकरांना विकण्याचा डाव आखला आहे," असा आरोप परब यांनी केला. "उद्या या समुद्रकिनाऱ्याचे खाजगीकरण होईल आणि हणजूण येथील स्थानिक लोकांना समुद्रात जाण्यासाठी दिल्लीकरांना पैसे द्यावे लागतील," अशी भीतीही परब यांनी व्यक्त केली.



हेही वाचा