गुंतवणुकीच्या नावाखाली १.३३ कोटींची फसवणूक
वास्को : गुंतवणुकीच्या नावाखाली आपली १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार येथील एका रहिवाशाने वास्को पोलीस स्थानकात केली होती. तथापि, सदर पैशाचा व्यवहार पणजी येथे झाल्याने तक्रार तेथे वर्ग करण्यात आली.संबंधित महिलेकडे पैसे मागितल्याने तिने आपल्यावर बलात्कार केला असल्याची पोलीस तक्रार करण्याची धमकी त्या गुंतवणूकदाराला दिली.
सदर महिलेने शेती व हॉटेल प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. या गुंतवणुकीमुळे मोठा परतावा मिळेल, असे आश्वासन तिने दिले. त्यामुळे तो रहिवाशी त्या महिलेच्या बोलण्याला भुलला. त्याने मोठी रक्कम गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. मात्र, खबरदारी घेताना त्या गुंतवणूकदाराने सदर रकमेचा धनादेश महिलेला दिले. मात्र, रक्कम दिल्यावर संबंधित कागदपत्रे घेण्यासंबंधी त्या गुंतवणूकदाराने हयगय केली होती. मोठ्या प्रमाणात रक्कम हाती पडल्यावरही त्या महिलेने त्याला कोणतीही कागदपत्रे दिली नव्हती. त्याने माहिती मागितली होती. तथापि, त्याला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. मार्च ते ऑक्टोबर २०२५ या दरम्यान हा व्यवहार करण्यात आला होता. सहा- सात महिने उलटून गेल्यावरही कोणतीही कागदपत्रे नसल्याने तसेच कोणताही परतावा मिळाला नसल्याने त्या गुंतवणकदाराला संशय आला. त्याने आपल्या गुंतवणुकीसंबंधी माहिती देण्याचा तसेच रक्कम परत करावी यासाठी तगादा लावला. तथापी त्या महिलेकडून ती रक्कम मिळणे दूर याउलट त्या महिलेने आपल्यावर बलात्कार केला असल्याची पोलीस तक्रार करण्याची धमकी त्या गुंतवणूकदाराला दिली. त्यामुळे आपण फसलो गेल्याची जाणीव झाल्याने त्या रहिवाशाने पोलिसात धाव घेतली. सदर रक्कम त्या महिलेने स्वतःसाठी वापरली आहे, असा संशय गुंतवणूकदाराने व्यक्त केला आहे.