वास्को रेल्वे पोलीस स्थानकात तक्रार : सोन्याचे दागिने, मोबाईल, रोकड लांबविली
वास्को : पूरना एक्स्प्रेस रेल्वेने दि. १९ रोजी मिरज रेल्वेस्थानक ते एर्नाकुलम रेल्वे स्थानक दरम्यान प्रवास करीत असताना अज्ञात व्यक्तीने आपल्या पत्नीची पर्स चोरली. पर्समध्ये २० लाख ६० हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम होती अशी तक्रार केरळ येथील कैलास पी यांनी वास्को रेल्वे पोलीस स्थानकात केली आहे. सदर गुन्हा गोवा रेल्वे हद्दीत घडल्याने त्यांनी येथे तक्रार केली आहे. याप्रकरणी वास्को रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भा. न्या. संहिता २०२३ च्या ३०३(२) कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास पी हे आपली पत्नी व मुलीसह १९ ऑक्टोबरला मिरज रेल्वे स्थानक ते एर्नाकुलम रेलस्थानक या दरम्यान पूरना एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करीत होते. रेल्वे लोंढा जंक्शन ते कुळे रेल्वे स्थानक दरम्यान असताना सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान कोणी अज्ञात व्यक्तीने कैलास पी यांच्या पत्नीची गुलाबी रंगाची हॅण्डबॅग चोरली. त्या हॅण्डबॅगमध्ये सोन्याच्या सहा बांगड्या, सोन्याचा एक नेकलेस, सोन्याचे एक ब्रेसलेट, सोन्याच्या सहा अंगठ्या, सोन्याची २०० ग्रॅम वजनाची पाच कर्णफुले, साठ हजार रुपये किमतीचा एक व्हिवो मोबाईल तसेच रोख रुपये ६२ हजार ७०० रुपये असा २० लाख ६० हजार रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी वास्को रेल्वे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक कृष्णा ताल्पी पुढील तपास करीत आहेत.